हापूस थेट मुंबईकरांपर्यंत, परळमध्ये आंबा महोत्सवाचे आयोजन
वैभव परब, एबीपी माझा | 05 May 2017 11:26 PM (IST)
मुंबई : कोकणातील हापूस आंब्याची चव न्यारीच असते. त्यामुळे जगभरात कोकणातील आंब्याला मागणी असते. आता मुंबईकरांसाठी खास महोत्सवात कोकणतील हापूस आंब्याची चव चाखायला मिळणार आहे. काँग्रेसचे आमदार नितेश राणे मुंबईत ‘आंबा महोत्सव’ आयोजित करणार आहेत. 6 आणि 7 मे रोजी मुंबईतील परळच्या दामोदर हॉल मैदानात या आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. सिंधुदुर्गातील बागायतदार त्यांचे आंबे घेऊन थेट मुंबईत दाखल होणार आहेत आणि या महोत्सवाच्या माध्यमातून मुंबईकरांसमोर ठेवणार आहेत. हापूस आंब्याच्या नावाखाली अनेकदा ग्राहकांची फसवणूक झाल्याचे प्रकरणं समोर आली आहेत. मात्र, आता आंबा महोत्सवाच्या निमित्ताने कोकणातला अस्सल हापूस आंबा मुंबईकरांना चाखायला मिळणार आहे.