मुंबई : भारतीय क्रिकेट संघाच्या 2019 मधील पहिल्या दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. न्यूझीलंड दौऱ्यात टीम इंडिया यजमान संघासोबत दोन हात करुन वर्षाची विजयी सुरुवात करण्यासाठी उत्सुक असेल.

23 जानेवारी 2019 पासून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. यात पाच वन डे आणि तीन टी 20 सामने खेळवले जाणार आहेत. भारताच्या दौऱ्याचे वेळापत्रक आज न्यूझीलंड क्रिकेटने जाहीर केलं. ऑकलंड, हॅमिल्टन, वेलिंग्टन, नेपियर आणि माउंट मॉनगनुई या ठिकाणी भारत न्यूझीलंड यांच्यातील सामने खेळवले जातील.

भारत दौऱ्याआधी श्रीलंकेचा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर असणार आहे. यात दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि एक सामन्यांचा समावेश आहे.

2018 च्या अखेरीस भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असणार आहे. त्यामुळे कांगारुंवर मात करत किवींना लोळवण्याचा टीम इंडियाचा इरादा असेल. यानंतर अवघ्या काही दिवसांच्या कालावधीमध्येच भारतीय संघाला न्यूझीलंडला जावे लागणार आहे.

भारत सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातल्या ट्वेन्टी ट्वेन्टी मालिकेत टीम इंडियानं 2-1 अशी बाजी मारली होती. तर वन डेत इंग्लंड संघाची 2-1 अशी सरशी झाली होती.

भारतीय संघाचं न्यूझीलंड दौऱ्याचं वेळापत्रक

  • पहिली वन डे : 23 जानेवारी 2019 (नेपियर)

  • दुसरी वन डे : 26 जानेवारी 2019 (माऊंट मॉनगनुई)

  • तिसरी वन डे : 28 जानेवारी 2019 (माऊंट मॉनगनुई)

  • चौथी वन डे : 31 जानेवारी 2019 (हॅमिल्टन)

  • पाचवी वन डे : 3 फेब्रुवारी 2019 (वेलिंग्टन)

  • पहिली टी-20 : 6 फेब्रुवारी 2019 (वेलिंग्टन)

  • दुसरी टी-20 : 8 फेब्रुवारी 2019 (ऑकलंड)

  • तिसरी टी-20 : 10 फेब्रुवारी 2019 (हॅमिल्टन)