मुंबई : टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकांसह साहाय्यक प्रशिक्षकांचा कालावधी सध्या सुरु असलेल्या विंडीज दौऱ्यानंतर संपुष्टात येणार आहे. त्यामुळे बीसीसीआयनं टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकपदासाठी सहा उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. टीम इंडियाचे विद्यमान प्रशिक्षक रवी शास्त्रींसह आणखी पाचजण या अंतिम शर्यतीत दाखल झाले आहेत.


प्रशिक्षकपदासाठीच्या उमेदवारांची कारकीर्द


रवी शास्त्री
भारताचे माजी कसोटीवीर असलेल्या रवी शास्त्रींना आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा चांगलाच अनुभव आहे. 1981 ते 1992 या अकरा वर्षांच्या कारकीर्दीत शास्त्री यांनी 230 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्यात त्यांच्या नावावर 6938 धावा आणि 280 विकेट्स जमा आहेत. 2017 साली अनिल कुंबळेनंतर भारतीय संघाचं प्रशिक्षकपद शास्त्रींकडे सोपवण्यात आलं होतं. त्यानंतर गेल्या दोन वर्षांत शास्त्रीच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाच्या कामगिरीचा आलेख हा चढत्या भाजणीचा राहिला आहे. विशेष म्हणजे कर्णधार विराट कोहलीची प्रशिक्षक म्हणून शास्त्रींनाच पसंती आहे.


टॉम मूडी
ऑस्ट्रेलियाचे माजी कसोटीवीर टॉम मूडी टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीतलं मोठं नाव आहे. 2005 सालीही टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी मूडी आणि ग्रेग चॅपेल यांच्यात चुरस होती. पण त्यावेळी चॅपेल यांची निवड झाल्यानंतर मूडी यांनी श्रीलंकेचं प्रशिक्षकपद स्वीकारलं होतं. आणि 2007 च्या विश्वचषकात श्रीलंकेला अंतिम फेरी गाठून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. त्यानंतर मूडी यांनी आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाब आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांच्या प्रशिक्षकपदाची धुरा यशस्वीरित्या सांभाळली आहे.


माईक हेसन
न्यूझीलंड संघाचे माजी प्रशिक्षक माईक हेसन यांच्या गाठीशी प्रशिक्षकपदाच्या अनुभवाची मोठी शिदोरी आहे. 2012 साली जॉन राईट यांच्याकडून प्रशिक्षकपद स्वीकारल्यानंतर हेसन यांनी न्यूझीलंड क्रिकेटला मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलं होतं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली न्यूझीलंडनं 2015 सालच्या वन डे विश्वचषकात उपविजेतेपद पटकावलं होतं.


फिल सिमन्स
वेस्ट इंडिजच्या नावाजलेल्या अष्टपैलू खेळाडूंमधलं एक नाव म्हणजे फिल सिमन्स. 2002 पासून गेली 17 वर्ष सिमन्स यांना प्रशिक्षकपदाचा तगडा अनुभव आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत झिम्बाब्वे, आयर्लंड आणि अफगाणिस्तानसारख्या दुबळ्या समजल्या जाणाऱ्या संघांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठी उंची गाठली आहे.


लालचंद राजपूत
भारताचे माजी कसोटीवीर लालचंद राजपूत यांनी 2007 च्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक विजेत्या संघाचे मॅनेजर म्हणून काम पाहिलं होतं. त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर झिंबाब्वे आणि अफगाणिस्तान संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा राजपूत यांनी यशस्वीरित्या सांभाळली आहे.


रॉबिन सिंग
टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीतलं अखेरचं नाव म्हणजे रॉबिन सिंग. रॉबिन सिंगनं 2004 साली क्रिकेटला रामराम ठोकल्यानंतर हॉन्ग कॉन्ग संघाचं प्रशिक्षकपद स्वीकारलं होतं. 2007 ते 2009 दरम्यान रॉबिन सिंग भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक राहिले आहेत. याशिवाय सध्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाची जबाबदारी त्यांच्याच खांद्यावर आहे.


भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक निवडीची जबाबदारी कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील क्रिकेट सल्लागार समितीकडे सोपवण्यात आली आहे. त्यामुळे आता या सहा शिलेदारांपैकी टीम इंडियाचा प्रशिक्षक कोण होणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.