सिक्कीममध्ये एकही आमदार नसलेला भाजप बनला थेट प्रमुख विरोधी पक्ष
एबीपी माझा वेब टीम | 13 Aug 2019 07:49 PM (IST)
सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंटने 15 जागा जिंकल्या होत्या. मात्र त्यांचे काही उमेदवार दोन ठिकाणाहून विजयी झाल्याने त्यांचे संख्याबळ 13 राहिले होते.
नवी दिल्ली : सिक्कीमच्या इतिहासात कालपर्यंत एकही आमदार नसलेला भारतीय जनता पक्ष आज थेट प्रमुख विरोधी पक्ष बनला आहे. तीन महिन्यापूर्वीच्या निवडणुकीत एकही जागा जिंकू न शकलेल्या भाजपने फोडाफोडीचं राजकारण करुन ही किमया साधली आहे. सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंट (SDF) या सिक्कीम विधानसभेतील प्रमुख विरोधी पक्षात फूट पडली आणि 13 पैकी 10 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सिक्कीममध्ये सध्या 32 पैकी 17 जागा जिंकणाऱ्या सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाचे सरकार आहे. सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंटच्या 10 आमदारांनी भाजपचे ईशान्य भारताचे प्रभारी राम माधव, खासदार अनिल बालुनी यांच्या उपस्थित भारतीय जनता पक्षात अधिकृतपणे प्रवेश केला. त्यानंतर सर्व 10 आमदारांनी कार्यकारी अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांची भेट घेतली. सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंटने 15 जागा जिंकल्या होत्या. मात्र त्यांचे काही उमेदवार दोन ठिकाणाहून विजयी झाल्याने त्यांचे संख्याबळ 13 राहिले होते. त्यातील दहा आमदारांनी आज भाजपचा झेंडा हाती घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली राज्याचा विकास होईल म्हणून पक्षांतर केल्याचं आमदारांनी सांगितलं. महत्वाचं म्हणजे सिक्कीममध्ये 1994 पासून म्हणजे तब्बल 25 वर्ष सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंटचं सरकार होतं. पूर्वोत्तर भारतात हळुहळू पाऊल घट्ट रोवण्याचा भाजप प्रयत्न करत आहे, त्या प्रयत्नाचा हा एक भाग आहे.