मुंबई : क्रिकेट आणि बॉलिवूडचं खास कनेक्शन आहे. क्रिकेटविश्वातील आणि चित्रपटसृष्टीतील अनेकांची नाती जुळल्याची बरीच उदाहरणं पाहायला मिळतात. आता यात टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि अभिनेत्री निमरत कौर यांचं नाव समोर येत आहे.


माजी क्रिकेटर रवी शास्त्री आणि निमरत कौर मागील दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. 2015 मध्ये एका कार लॉन्चिंगच्या निमित्ताने रवी शास्त्री आणि निमरत कौर यांची भेट झाली होती. तेव्हापासूनच त्यांच्या अफेअरची सुरुवात झाल्याचं म्हटलं जात आहे.

रवी शास्त्री यांनी 1990 मध्ये रितू सिंह यांच्याशी लग्न केलं होतं. मात्र 22 वर्षांनी म्हणजेच 2012 मध्ये त्यांनी घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता. रवी शास्त्री आणि रितू सिंह यांच्यात अनेक काळापासून वाद सुरु होते. त्यानंतर दोघांनी संसार मोडण्याचा निर्णय घेतला. या दोघांना अलका नावाची एक मुलगी आहे.

रितू सिंह यांच्याशी लग्न होण्याआधी रवी शास्त्री आणि अमृता सिंह यांच्या अफेअरची चर्चा होती. त्यावेळी अमृता सिंह स्टेडियममध्ये जाऊन रवी शास्त्री यांना चिअर करायची. पण अमृता आणि रवी यांचं लग्न होऊ शकलं नाही. त्यानंतर दोघांचे मार्ग वेगळे झाले.

रवी शास्त्री सध्या टीम इंडियासोबत इंग्लंड दौऱ्यावर आहेत. तर निमरत ऑल्ट बालाजीच्या वेब सीरिजमध्ये दिसली होती. निमरत इरफान खानच्या 'लंच बॉक्स'मध्ये झळकली होती. याशिवाय तिने 'एअरलिफ्ट'मध्ये अक्षय कुमारसोबत काम केलं होतं.