मुंबई: मुंबईसह राज्यभरात दहीहंडीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. ठाण्यातल्या वर्तकनगरमध्ये प्रताप सरनाईक यांनी आयोजित केलेल्या प्रो-दहीहंडीत 15 गोविंदा पथकांनी सहभाग घेतल्याने स्पर्धेला रंग चढला. विविध ठिकाणी गोविंदा पथकांचा उत्साह वाढवण्यासाठी बॉलिवूड आणि मराठी सिने कलाकारांनी हजेरी लावली.


घाटकोपरमध्ये आमदार राम कदम आयोजित दहीहंडीला दरवर्षीप्रमाणे सेलिब्रिटींची हजेरी पाहायला मिळाली. वरुण धवन, राधिका आपटे, मोनिका बेदी, प्राची देसाई अशा विविध बॉलिवूड तारे-तारकांनी मंचावर उपस्थिती लावली. बोरिवलीत शिवसेना आमदार प्रकाश सुर्वेंनी आयोजित केलेल्या दहीहंडीला गोविंदा पथकांनी थर रचून सलामी दिली. गोविंदांचा उत्साह वाढवण्यासाठी अनेक मराठी कलाकार आणि अभिनेत्रींनी ठेका धरला.

ठाण्यात जय जवान गोविंदा पथकाने 9 थर रचून मुख्यमंत्र्यांना सलामी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घाटकोपरमध्ये हंडी फोडली. आपल्याला विकासाचा थर लावायचा आहे. जो कमजोर आहे त्याला वरती घेऊ, आणि जो मजबूत आहे तो खाली राहील. तेव्हा आपण समाजाचा विकासाचा थर वर न्यायचा, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी समृद्ध महाराष्ट्राचा संदेश देणारी दहीहंडी फोडली.

गेली काही वर्ष संघर्ष दहीहंडी आयोजित करणारे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड स्वतःला रोखू शकले नाहीत आणि थेट नौपाड्यातील मनसेच्या दहीहंडीत दाखल होत गोविंदांसोबत थिरकले.

मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशानुसार 14 वर्षांखालील गोविंदांना सहभागी होण्यास बंदी घालण्यात आली आहे. गेल्या वर्षी बालगोविंदांना सहभागी करणाऱ्या मंडळांवर कारवाई होत होती. यंदा मात्र पालकांवरही कारवाई होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. फक्त मुंबईतच नाही, तर ठाणे, नवी मुंबई आणि पुण्यासह मुख्य शहरांमध्ये पोलिसांनी असा इशारा दिल्याचं कळतंय.

धारावीत एका गोविंदाचा मृत्यू झाल्यानं दहीहंडीच्या उत्सवाला गालबोट लागलं. 20 वर्षीय कुश खंदारे थरावर चढत असताना चक्कर येऊन खाली पडला. त्याला तातडीने सायन रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. कुश हा धारावीतील कन्हैय्या मार्ग परिसरात राहत होता.

मुंबईत दहीहंडीचा उत्सव साजरा करताना आतापर्यंत एकूण 121 गोविंदा जखमी झाले आहेत. 25 गोविंदांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत, तर 95 जणांना उपचार करुन सोडून देण्यात आलं आहे. सायन, केईएम, नायर, रहेजा, भाभा, राजावाडी या रुग्णालयांमध्ये गोविंदांवर उपचार सुरु आहेत.

ठाण्यात मध्यरात्री मोठ्या उत्साहात कृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी महिला भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पारंपरिकरित्या हा उत्सव साजरा करण्यात आला.

 



ठाणे - सालाबादप्रमाणे ठाण्यातही दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. नौपाड्यात अनेक पथकांनी ढोलताशाची प्रात्यक्षिकं केली.

कृष्ण जन्माष्टमीनिमित्त पंढरपुरातही विठुरायच्या डोक्यावर मुंडासे आणि हातात चांदीची काठी देण्यात आली.  देवाच्या मस्तकी 110 हात लांबीचे वैशिष्ठ्यपूर्ण पागोटे बांधण्यात आले. विठ्ठल हे कृष्णाचंच रुप असल्याची श्रद्धा असल्यानं शेकडो वर्षांपासून विठ्ठल मंदिरात कृष्ण जन्मोत्सव साजरा होतो.  रात्री 12 वाजता जन्मसोहळ्यावेळी सभामंडपात बांधलेल्या पाळण्यात बाळकृष्णाच्या मूर्तीवर फुले उधळण्यात आली. हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक विठ्ठल मंदिरात उपस्थित होते.

LIVE UPDATE




  •  ठाणे - जय जवान पथकाची मुख्यमंत्र्यांना 9 थरांची सलामी

  • आतापर्यंत मुंबईत विविध ठिकाणी 6 गोविंदा जखमी

  • जोगेशवरीच्या युवा जिद्दी मराठा या गोविंद पथकाने चित्ररथ तयार करून महाराष्ट्र पोलिसांना मानवंदना दिली आहे. गेल्या दहा वर्षापासून हे पथक वेगवेगळ्या विषयावर चित्ररथ तयार करत आहे. यंदा हा चित्ररथ दहीहंडी उत्सवामध्ये अनेकांचं लक्ष वेधून घेतोय

  • ठाणे - स्वामी प्रतिष्ठानच्या दहीहंडीत आई चिखलादेवी गोविंदा मंडळाने क्लस्टरला विरोध करणारे फलक दाखवले...

  • शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी वरळीतील जांबोरी मैदानात आगळी वेगळी दहीहंडी उभारली आहे. दहीहंडी पारंपरिक पद्धतीनं साजरी करत कोणताही गाजावाजा न करत साध्या पद्धतीनं साजरी करत आहे. दुसरीकडे याच दहीहंडीच्या माध्यमातून केरळच्या पूरसग्रस्तांना मदत करणार आहेत

  • मुंबई : दहीहंडीचा सराव करताना जखमी झालेल्या 14 वर्षीय चिराग पटेकर या गोविंदाला मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्याकडून एक लाख रुपयांची मदत, चिराग पटेकरवर खार इथल्या होली फॅमिली हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरु


मुंबई उपनगरात देखील दहीहंडी उत्सवाला जल्लोषात सुरुवात झाली आहे. घाटकोपर येथील भटवडी विभागात लोकसेवा चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आयोजित दहीहंडी उत्सवाला विधीवत पूजन करून सुरुवात झाली. या ठिकाणी महिला आणि पुरुष गोविंदा पथकांनी थर लावून सलामी देण्यास सुरुवात केली आहे.


कोकण नगर गोविंदा पथकाने 6 थर लावून दादरची  दहीहंडी फोडली


दादरमध्ये थर लावायला सुरुवात, जोगेश्वरीच्या साईराम गोविंदा पथकाची 8 थरांची सलामी


1) साईराम गोविंदा पथक जोगेश्वरी 8 थराची सलामी दिली


2) युवा जिद्दी मराठा गोविंदा पथकाने चित्ररथद्वारे महाराष्ट्र पोलिसांना मानवंदना दिली


3) हिंदू एकता गोविंदा पथक 8 थर सलामी


येवला - 


गोकुळाष्टमीनिमित्त येवल्यामध्ये बाळगोपाळांची अनोखी वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांच्या धडपड मंचतर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या स्पर्धेत 130 बाळगोपाळांनी भाग घेतला. नटखट, गंभीर, खेळकर, बासरीवाला, दहिहंडीतील लोणी खाणाऱा माखणचोर अशी श्रीकृष्णाची अनेक रुपं बाळगोपाळांनी वेशभूषेच्या माध्यमातून साकारली . विशेष म्हणजे २ महिन्याच्या बालकापासून ३ वर्षांच्या मुलांनी यात सहभाग घेतला. शेवटी या बाळगोपाळांना बक्षीसांचं वितरणही करण्यात आलं.