डर्बी : चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारताच्या पराभावाचा वचपा भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राजच्या संघाने महिला विश्वचषकात काढला. या सामन्यात भारतीय महिलांनी पाकिस्तानचा 95 धावांनी धुव्वा उडवला.
एकता बिश्तच्या डावखुऱ्या फिरकीने पाकिस्तानविरुद्धच्या महिला विश्वचषकाच्या सामन्याला भारताच्या बाजूनं गिरकी दिली. या सामन्यात पाकिस्तानसमोर विजयासाठी 50 षटकांत अवघं 170 धावांचे आव्हान होतं. पण पाकिस्तानचा संघ 74 धावातच माघारी परतला.
भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना, पाकिस्तानच्या संघानं 38.1 षटकात सर्व गडी बाद 74 धावा केल्या.
या सामन्यात नव्या चेंडूने गोलंदाजीला आलेल्या एकता बिश्तनं पाकिस्तानच्या 5 फलंदाजांना बाद करून सामन्याला कलाटणी दिली. आणि या सामन्यात विजयाचं दानही भारताच्या बाजूने पडलं.
या सामन्यात भारताच्या डावात मोलाची भूमिका बजावली ती मुंबईच्या पूनम राऊतनं. सलामीच्या आलेल्या पूनमनं दीप्ती शर्माच्या साथीने 67 धावांची भागीदारी रचून भारतीय डावाला आकार दिला. तिने 72 चेंडूंमधली 47 धावांची खेळी पाच चौकारांनी सजवली.
त्यानंतर सुषमा वर्माच्या धडाकेबाज खेळीनं भारताला नऊ बाद 169 धावांची मजल मारून दिली. सुषमाने 35 चेंडूंत तीन चौकार आणि एका षटकारासह 33 धावांची खेळी उभारली.