मुंबई : ज्येष्ठ अभिनेते मधुकर तोरडमल यांचं आज ( दि. 2 जुलै) प्रदीर्घ आजारानं मुंबईतल्या राहत्या घरी निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. मुत्रपिंडाच्या आजाराने ते त्रस्त होते.
मधुकर तोरडमल यांना काही दिवसांपूर्वी एशियन हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा नसल्यानं त्यांना घरी पाठवण्यात आलं. पण शुक्रवार रात्रीपासून त्यांची प्रकृती पुन्हा खालावली. अखेर आज त्यांनी वांद्रे येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.
मधुकर तोरडमल यांची कारकीर्द
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तोरडमल यांनी कुर्ला येथील ‘प्रीमियर ऑटोमोबाइल’ कंपनीत काही काळ ‘लिपिक’ म्हणून काम केलं. त्यानंतर ते अहमदनगर येथील महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक होते. या काळात ‘भोवरा’, ‘सैनिक नावाचा माणूस’ आदी नाटके त्यांनी केली.
राज्य नाट्य स्पर्धेतूनही त्यांनी त्याकाळात सहभाग घेतला. या स्पर्धेतील त्यांचं ‘एक होता म्हातारा’ हे नाटक प्रचंड गाजलं. या नाटकात त्यांनी साकारलेल्या ‘बळीमामा’ या भूमिकेमुळे त्यांना ‘मामा’ ही बिरुदावली मिळाली आणि पुढे सगळेजण त्यांना ‘मामा’ म्हणायला लागले
यानंतर त्यांनी लिहिलेल्या ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क हे नाटक प्रचंड लोकप्रिय झालं. या नाटकाचे पाच हजारांहून अधिक प्रयोग झाले. या नाटकात डॉ. तोरडमल यांनी प्राध्यापक बारटक्केची भूमिका साकारली होती.
लेखक म्हणून त्यांनी कादंबरी, नाटक, चरित्र असे साहित्यप्रकार हाताळले असून अगाथा ख्रिस्ती या लेखिकेच्या कादंबऱ्यांचा अनुवादही त्यांनी केला आहे.
तरुण तुर्क म्हातारे अर्क नाटकाशिवाय गुड बाय डॉक्टर, गोष्ट जन्मांतरीची, चांदणे शिंपित जाशी, बेईमान, अखेरचा सवाल, घरात फुलला पारिजात, चाफा बोलेना, म्हातारे अर्क बाईत गर्क, ऋणानुबंध, किनारा, गगनभेदी, गाठ आहे माझ्याशी, गुलमोहोर, झुंज, भोवरा, मगरमिठी, लव्ह बर्ड्स, विकत घेतला न्याय, आदी नाटकंही प्रचंड गाजली.
मराठी रंगभूमीसोबतच मराठी चित्रपटसृष्टीतही त्यांचं मोठं योगदान होतं. ज्योतिबाचा नवस, सिंहासन, बाळा गाऊ कशी अंगाई, आपली माणसं, आत्मविश्वास, शाब्बास सूनबाई आदी सिनेमांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका साकारली होती.