पंढरपुरात भाविकांच्या तंबूवर भिंत कोसळली, एकाचा मृत्यू, दोन जखमी
एबीपी माझा वेब टीम | 02 Jul 2017 06:31 PM (IST)
पंढरपूर : आषाढी यात्रेसाठी पंढरपुरात आलेल्या भाविकांच्या तंबूवर भिंत पडून यात एकाचा मृत्यू झाला आहे. कराड रोड जवळील मोकळ्या जागेत भाविक तंबू टाकून विसावले असताना शेजारील संरक्षक भिंत या तंबूवर पडली. यात एकाचा मृत्यू झाला, तर दोन महिला जखमी झाल्या आहेत. भिंत कोसळल्यानंतर भाविकांनी तातडीने अडकलेल्या भाविकांना काढण्याचा प्रयत्न केला. मात्र यात परभणी जिल्ह्यातील पिंगळी गावचे रामकिसन माधव कराळे यांचा मृत्यू झाला. जखमी झालेल्या मंजुषाबाई आणि सुमनबाई कुदळे या जिंतूर येथील महिला भाविक जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झालं. पोलिसांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवलं. विठूरायाच्या दर्शनाची आस धरून पंढरपूरला आलेल्या भाविकांना या दुर्दैवी अपघाताचा सामना करावा लागला.