या विजयामुळे आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत निर्विवादरित्या अव्वल स्थानावर झेप घेतली. त्यामुळं आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत आता पाकिस्तानची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे.
ईडन गार्डन्सवरच्या दुसऱ्या कसोटीत भारतानं न्यूझीलंडवर 178 धावांनी मात केली. या कसोटीत भारतानं दुसऱ्या डावात सर्व बाद 263 धावांची मजल मारून, न्यूझीलंडला विजयासाठी 376 धावांचं आव्हान दिलं होतं.
टॉम लॅथम आणि मार्टिन गप्टिल यांनी 55 धावांची सलामी देऊन खेळात संघर्षाचा रंग भरला. पण अश्विननं गप्टिलला बाद करून ही जोडी फोडली आणि ठराविक अंतरानं न्यूझीलंडच्या विकेट्स पडायला लागल्या. मग अश्विननंच टॉम लॅथमची झुंजार खेळी संपुष्टात आणली. त्यामुळं भारताचा विजयाचा मार्ग सुकर झाला.
***************************************
कोलकाता कसोटीतही विजयी तिरंगा फडकवण्यासाठी टीम इंडियाला अवघ्या एक विकेटची गरज आहे. न्यूझीलंडचे 9 फलंदाज तंबूत परतले आहेत.
कोलकाता कसोटीत टीम इंडियानं न्यूझीलंडसमोर विजयासाठी 376 धावांचं आव्हान दिलंय. त्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडनं चहापानापर्यंत तीन बाद 135 धावांची मजल मारली असून, टॉम लॅथम 73 आणि ल्यूक रोन्की 7 धावांवर खेळत आहे.
त्याआधी मार्टिन गप्टिल आणि टॉम लॅथमनं 55 धावांची सलामी दिली. गप्टिल 24 धावांवर बाद झाला. मग लॅथमनं हेन्ऱी निकोल्सच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी रचली. हेन्ऱी निकोल्सला रवींद्र जाडेजानं 24 धावांवर माघारी धाडलं. तर रॉस टेलरनंही अवघ्या चार धावा करुन बाद झाला.
भारतासाठी रविचंद्रन अश्विननं दोन आणि जाडेजानं एक विकेट काढली.
********
कोलकाता : कोलकाता कसोटीत टीम इंडियाचा दुसरा डाव 263 धावांवर आटोपला. त्यामुळे न्यूझीलंडसमोर विजयासाठी 376 धावांचा आव्हान आहे.
रिद्धीमान साहा 58 धावांवर नाबाद राहिला. तर रोहित शर्माने 82 धावा केल्या. न्यूझीलंडतर्फे मॅट हेन्रीने तीन, ट्रेंट बोल्ट आणि मिचेल सँटनरने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
कोलकाता कसोटीच्या तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा पहिला डाव 204 धावांवर गुंडाळल्यानंतर भारताने 112 धावांची आघाडी घेतली होती. पण दुसऱ्या डावात किवी गोलंदाजांनी टीम इंडियाची दाणादाण उडवली. रोहित शर्माने विराट कोहलीच्या साथीने पाचव्या विकेटसाठी 48 धावांची आणि मग रिद्धिमान साहाच्या साथीने सातव्या विकेटसाठी 103 धावांची भागीदारी रचली. त्यामुळे भारताच्या डावाला आकार आला.
परंतु चौथ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यावर रिद्धीमान साहाने अर्धशतक पूर्ण केलं. तर भुवनेश्वर कुमार 23 धावा करुन बाद झाला. त्यानंतर आलेला मोहम्मद शमी एक धाव करुन परतला. त्यामुळे भारताचा डाव 263 धावांवर आटोपला.