साताराः अवघ्या महाराष्ट्रात सुरु असलेल्या मराठा क्रांतीने आता शिखर गाठलंय असं म्हणायला हरकत नाही. कारण मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी सातारा जिल्ह्यातल्या खटाव तालुक्यातल्या गुंडेवाडी या गावाने ठराव करून आपल्या गावाचं नामकरण 'मराठानगर' असं केलं आहे. गावाची संख्या 1400 असून, या गावात सर्वच मराठा समाजातील लोक आहेत.

काल महाराष्ट्रातल्या तब्बल 22 ते 25 हजार अधिक ग्रामपंचायतींमध्ये मराठा क्रांती मोर्चातील मागण्यांच्या अनुषंगाने ठराव केले गेले. यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करावी, कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशी द्यावी, शेतीला हमीभाव मिळण्यासाठी स्वाभिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, अरबी समुद्रातील शिवस्मारक तातडीने पूर्ण करावे असे ठराव करण्यात आले.

विदर्भातील दोन-तीन जिल्हे वगळता राज्यातील जवळ जवळ सर्व गावांच्या ग्रामसभांत मराठा क्रांती मोर्चातील मागण्यांच्या अनुषंगाने ठराव करण्यात आले. मराठवाड्यातील सुमारे 90 टक्के ग्रामपंचायतींनी ग्रामसभांचे आयोजन करून अशा प्रकारचे ठराव केले. मराठवाड्यातील ग्रामसभांमध्येही स्वच्छ भारत अभियान, घरकुल योजना या विषयांसह ऐनवेळी मराठा समाजाला आरक्षण द्यावे, असे ठराव घेण्यात आले.