चेन्नई: रोमांचक ठरलेल्या अंतिम सामन्यात भारताने विंडीजवर शेवटच्या चेंडूवर 6 गड्यांनी विजय मिळवला. सलामीवीर शिखर धवन आणि रिषभ पंतच्या धडाकेबाज खेळीच्या बळावर भारताने वेस्ट इंडीजवर अखेरच्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात 6 गड्यांनी मात केली. या विजयासह भारताने ट्वेन्टी ट्वेन्टी मालिका देखील खिशात घातली आहे.
कर्णधार रोहित शर्मा आणि के. एल राहुल लवकर बाद झाल्यानंतर शिखर धवन आणि रिषभ पंतने विजयावर शिक्कामोर्तब केला. धवनने केवळ 62 चेंडूंमध्ये 2 षटकार आणि 10 चौकारांच्या मदतीने 92 धावांची खेळी केली तर रिषभ पंतने 38 चेंडूंमध्ये 58 धावा केल्या. यामध्ये 3 षटकार आणि 5 चौकारांचा समावेश होता. विजयला 7 धावा बाकी असताना तो बाद झाला.
वेस्ट इंडिजने दिलेल्या 182 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला कर्णधार रोहित शर्माचा रूपाने पहिला झटका बसला. रोहितला केवळ ६ धावा करता आल्या. यानंतर आलेल्या के. एल. राहुलने 4 चौकारांच्या मदतीने 17 धावांची खेळी केली. तो 17 धावांवर बाद झाला. वेस्ट इंडिजकडून किमो पॉलने 2 तर थॉमसने 1 गडी बाद केला. शिखर धवन आणि रिषभ पंतनं तिसऱ्या विकेटसाठी 130 धावांची अभेद्य भागीदारी रचून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. धवनला सामनावीर तर कुलदीप यादवला मालिकावीराचा बहुमान देण्यात आला.
अंतिम षटकात रोमांचक स्थिती
फॅबिन अलेन च्या शेवटच्या षटकात 5 धावांची आवश्यकता होती. पहिल्या चेंडूवर धवनने 2 धावा काढल्या. दुसऱ्या चेंडूवर 1 धाव निघाली. तिसऱ्या चेंडूवर मनीष पांडेने एक धाव काढत पुन्हा धुरा धवनच्या हाती सोपवली. चौथ्या चेंडूवर एकही धाव घेता आली नाही तर पाचव्या चेंडूवर धवन बाद झाला. शेवटच्या चेंडूवर एक धाव हवी असताना मनीष पांडेने कशीबशी धाव पूर्ण केली आणि विजयावर शिक्कामोर्तब केला.
विंडीजचे भारतासमोर 182 धावांचे लक्ष्य
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील अखेरच्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात विंडीजने भारतासमोर 182 धावांचे लक्ष्य ठेवले होते. शेवटच्या दहा षटकात निकोलस पूरन आणि डेरेन ब्राव्होने केलेल्या फटकेबाजीच्या बळावर विंडीजने आव्हानात्मक धावसंख्या उभारली होती.विंडीजने नाणेफेक फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विंडीजचे सलामीवीर हेटमायर आणि होप यांनी धडाकेबाज सुरुवात करत 6 षटकात अर्धशतक गाठले. पण त्यानंतर लगेचच होप 24 धावांवर तंबूत परतला. फटकेबाजीने डावाची सुरुवात करणारा हेटमायर 26 धावा करून बाद झाला. त्याने 4 चौकार आणि 1 षटकार लगावला. मात्र चहलने त्याचाही अडसरही दूर केला करत दुसरा बळी मिळवला. यानंतर आलेल्या अनुभवी दिनेश रामदीनकडून विंडीजला अपेक्षा होत्या. पण तोदेखील स्वस्तात तंबूत परतला. त्याने 15 चेंडूत 15 धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदरने त्याला त्रिफळाचित केले. ब्राव्हो आणि पूरनने शेवटच्या षटकांत जोरदार फटकेबाजी केली
सर्व मालिकांवर भारतीय संघाचा दबदबा
विंडीजच्या भारत दौऱ्यातील ही शेवटची मालिका होती. ही मालिका भारताने पहिलेच 2-0 ने जिंकली होती. यापूर्वी भारताने कसोटी मालिका 2-0 ने जिंकली असून एकदिवसीय मालिका 3-1 ने खिशात घातली होती. भारताने या सामन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि फिरकीपटू कुलदीप यादव यांना या सामन्यासाठी विश्रांती दिली असून त्यांच्या जागी भारताने युझवेन्द्र चहल, वॉशिंग्टन सुंदर या दोन फिरकीपटूंना संधी दिली होती.