चेन्नई: भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील अखेरच्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात विंडीजने भारतासमोर 182 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. शेवटच्या दहा षटकात निकोलस पूरन आणि डेरेन ब्राव्होने केलेल्या फटकेबाजीच्या बळावर विंडीजने आव्हानात्मक धावसंख्या उभारली आहे.

विंडीजने नाणेफेक फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विंडीजचे सलामीवीर हेटमायर आणि होप यांनी धडाकेबाज सुरुवात करत 6 षटकात अर्धशतक गाठले. पण त्यानंतर लगेचच होप 24 धावांवर तंबूत परतला. फटकेबाजीने डावाची सुरुवात करणारा हेटमायर 26 धावा करून बाद झाला. त्याने 4 चौकार आणि 1 षटकार लगावला. चहलनेच त्याचा अडसर दूर केला. यानंतर आलेला अनुभवी दिनेश रामदीन स्वस्तात तंबूत परतला. त्याने 15 चेंडूत 15 धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदरने त्याला त्रिफळाचित केले.

यानंतर ब्राव्हो आणि पूरनने शेवटच्या षटकांत जोरदार फटकेबाजी केली. पूरनने केवळ 25 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 53 धावांची खेळी केली तर ब्राव्होने 37 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 43 धावा केल्या.

विंडीजच्या भारत दौऱ्यातील ही शेवटची मालिका आहे. ही मालिका भारताने पहिलेच 2-0 ने जिंकली आहे. यापूर्वी भारताने कसोटी मालिका 2-0 ने जिंकली असून एकदिवसीय मालिका 3-1 ने खिशात घातली होती. भारताने ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि फिरकीपटू कुलदीप यादव यांना या सामन्यासाठी विश्रांती दिली असून त्यांच्या जागी भारताने युझवेन्द्र चहल, वॉशिंग्टन सुंदर या दोन फिरकीपटूंना संधी दिली आहे.