नवी दिल्लीः टीम इंडियाने कोलकात्याच्या दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडला हरवलं, तर आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत भारताला निर्विवाद अव्वल स्थान मिळू शकणार आहे. शिवाय भारताने पहिलं स्थान मिळवल्यास पाकिस्तानच्या दुसऱ्या स्थानावर घसरण करण्याची नामी संधी भारताकडे आहे.
भारताने कानपूरच्या पहिल्या कसोटीत न्यूझीलंडचा 197 धावांनी धुव्वा उडवून, आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत पाकिस्तानसह संयुक्तरित्या अव्वल स्थान मिळवलं आहे. दोन्ही संघांच्या खात्यात सध्या प्रत्येकी 111 गुण आहेत. टीम इंडियानं कोलकाता कसोटी जिंकली, तर भारताच्या खात्यात आणखी गुणांची भर पडेल आणि टीम इंडिया आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत निर्विवादरित्या नंबर वन होईल.
दरम्यान, कानपूर कसोटीत भारतीय विजयाचा शिल्पकार ठरलेल्या रवीचंद्रन अश्विनने कसोटी गोलंदाजांसाठीच्या आयसीसी क्रमवारीत एक पाऊल पुढे टाकलं आहे. या क्रमवारीत अश्विनने तिसऱ्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.