मुंबई : मुंबईतील काळाघोडा परिसरात ‘वीकेंड आर्ट गॅलरी’ उभारण्यासाठी महापालिका आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मांडलेला हा प्रस्ताव मुंबईच्या सांस्कृतिक विश्वासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळावी म्हणून आदित्य ठाकरेंनी स्वत: आयुक्तांची भेट घेतली होती.
‘वीकेंड आर्ट गॅलरी’ संकल्पना काय आहे?
काळाघोडा परिसरात शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी खुले कलादालन भरवले जाणार आहे. यामध्ये चित्रकार, रांगोळी काढणारे कलाकार आणि अन्य कलाकार सहभागी होऊ शकतील. मुंबईच्या कला आणि सांस्कृतिक विश्वात ‘वीकेंड आर्ट गॅलरी’ला नक्कीच महत्त्व प्राप्त होणार आहे.
आदित्य ठाकरेंचा पुढाकार
‘वीकेंड आर्ट गॅलरी’चा प्रस्ताव मंजूर व्हावा, यासाठी आदित्य ठाकरे यांनी स्वत: पुढाकारही घेतला आणि थेट मुंबई महापालिका आयुक्तांची भेट घेतली. संबंधीत वॉर्ड अधिकाऱ्यांनी तयार केलेल्या प्रस्तावाला आता पालिका आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळ लवकरच काळाघोडा परिसरात ‘वीकेंड आर्ट गॅलरी’ उभारली जाणार आहे.
काळाघोडा परिसरातील वाहतुकीत करणार
‘वीकेंड आर्ट गॅलरी’ शनिवार आणि रविवारी भरवलं जाणार असल्याने या दोन दिवशी काळाघोडा परिसरातील वाहतूक थांबवण्यात येणार आहे. फक्त पादचाऱ्यांसाठी रस्ते मोकळे केले जाणार असल्याचीही माहिती मिळते आहे. या प्रस्तावाला पोलिस, ट्रॅफिक यांची मंजुरी मिळणे अद्याप बाकी आहे.
देशविदेशात जशा रस्त्यावर कलाकृती सादर केल्या जातात. त्याच धर्तीवर ‘वीकेंड आर्ट गॅलरी’चा प्रस्ताव आहे. आदित्य ठाकरे यांनी मुंबईत नाईट लाईफचाही प्रस्ताव मांडला होता.