या कसोटीत भारताच्या रिषभ पंतचं शतक अवघ्या आठ धावांनी हुकलं, पण विराट कोहलीने सवयीने शतक झळकावलं. विराट आणि रिषभ पंतने पाचव्या विकेटसाठी 133 धावांची भागीदारी रचली. या भागिदारीत पंतचा वाटा 92 धावांचा होता. त्याच्या 84 चेंडूंमधल्या खेळीला आठ चौकार आणि चार षटकारांचा साज होता. विराटने दहा चौकारांसह 139 धावांची खेळी उभारली. रवींद्र जाडेजाने 132 चेंडूंत आपलं शतक साजरं केलं.
विराटच्या सलग तिसऱ्या कॅलेंडर वर्षात एक हजार धावा
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने सलग तिसऱ्या कॅलेंडर वर्षात एक हजार धावांचा टप्पा ओलांडून आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. ही कामगिरी बजावणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला. विराटने राजकोट कसोटीत 139 धावांची खेळी उभारली.
विराटने 121 वी धाव घेऊन, 2018 या कॅलेंडर वर्षात एक हजार धावांचा टप्पा गाठला. त्याच्या खात्यावर वर्षभरात नऊ कसोटी सामन्यांमध्ये 1018 झाल्या धावा आहेत. टीम इंडियाच्या कर्णधाराने गेल्या दोन कॅलेंडर वर्षात अनुक्रमे 12 कसोटी सामन्यांत 1215 धावा आणि 10 कसोटी सामन्यांत 1059 धावा अशी कामगिरी बजावली आहे.
पृथ्वी शॉचं पदार्पणात शतक
मुंबईच्या पृथ्वी शॉने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करून राजकोट कसोटीत पदार्पणात शतक झळकावलं. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पदार्पणात शतक ठोकणारा पृथ्वी शॉ हा पंधरावा भारतीय फलंदाज ठरला. त्याने 99 चेंडूंत पंधरा चौकारांच्या सहाय्याने आपलं शतक साजरं केलं.
पहिल्या दिवशी चहापानाआधीच्या अखेरच्या षटकात देवेंद्र बिशूने पृथ्वी शॉला माघारी धाडलं. बिशूने स्वत:च्याच गोलंदाजीवर त्याचा झेल पकडला. पृथ्वीने 154 चेंडूंत 19 चौकारांसह 134 धावांची खेळी उभारली.
संबंधित बातम्या :