अँटिगा: अनिल कुंबळेच्या तालमीत नव्या आत्मविश्वासानं भरलेली टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्याच्या आव्हानाला सामोरी जाण्यासाठी सज्ज झाली आहे. भारत आणि विंडीज संघांमधल्या पहिल्या कसोटी सामन्याला आजपासून अँटिगामध्ये सुरुवात होत आहे.


 

कधी ड्रम सेशन... कधी व्हॉलीबॉल... तर कधी साखळी साखळी... भारतीय संघाच्या टीम बॉण्डिंगसाठी कुंबळे गुरुजींनी सरावात प्रयोगांची जणू मालिकाच राबवली. कुंबळे गुरुजींच्या या प्रयोगांनी टीम इंडियाच्या फिटनेस आणि आत्मविश्वासात नक्कीच मोलाची भर घातली आहे. आता विंडीज दौऱ्याच्या आव्हानाला सामोरी जाण्याच्या दृष्टीनं कोहली अँड कंपनी किती कणखर बनली आहे, याची पहिली परीक्षा अँटिगाच्या मैदानात होणार आहे. अँटिगातली ही परीक्षा केवळ टीम इंडियाचीच नाही, तर कुंबळे गुरुजींचीही पहिली परीक्षा असेल.

 

विराट कोहलीची टीम इंडिया आणि जेसन होल्डरची वेस्ट इंडियन फौज यांच्यामधला पहिला कसोटी सामना आजपासून अँटिगाच्या सर व्हिव रिचर्डस स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. चार कसोटी सामन्यांच्या या मालिकेत वेस्ट इंडिजच्या तुलनेत विराट अँड कंपनीचं पारडं बरंच जड आहे आणि विंडीजचा कर्णधार जेसन होल्डरनंही ही बाब मान्य केली आहे. आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या टीम इंडियाची फलंदाजी आणि गोलंदाजी उच्च दर्जाची आहे. तसंच भारतीय संघाच्या तुलनेत विंडीजचा संघ हा तरुण आणि अननुभवी आहे. त्यामुळं भारताचं आव्हान आमच्यासाठी कठीण असल्याचं होल्डरनं म्हटलं होतं. विंडीजचा कर्णधार जेसन होल्डरला वाटणारी चिंता नक्कीच चुकीची नाही.

 

64 कसोटी खेळणारा मार्लन सॅम्युअल्स, 42 कसोटी सामने खेळणारा डॅरेन ब्राव्हो आणि 24 कसोटी खेळणारा क्रेग ब्रॅथवेट यांचा अपवाद सोडला, तर विंडीज संघातला एकही खेळाडू 15 कसोटी सामने खेळलेला नाही. सॅम्युअल्स आणि ब्राव्होलाही आजवरच्या कसोटी कारकीर्दीत सातत्यपूर्ण कामगिरी बजावता आलेली नाही. वेस्ट इंडिज संघातल्या तेरा खेळाडूंच्या नावावर मिळून एकूण 187 कसोटी सामने जमा आहेत, त्याउलट भारताच्या एकट्या ईशांत शर्मानंच 68 कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे.

 

टीम इंडियानं गेल्या दहा वर्षांमध्ये दोनवेळा वेस्ट इंडिजमध्ये कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम गाजवला आहे. 2006 साली राहुल द्रविडच्या नेतृत्त्वाखाली आणि मग 2011 साली महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वाखाली भारतानं कसोटी मालिका जिंकली होती. आता कॅरिबियन भूमीवर सलग तिसरी कसोटी मलिका जिंकण्याचा विराट कोहलीच्या टीम इंडियाचा प्रयत्न आहे.

 

विशेष म्हणजे विराट कोहलीच्याच नेतृत्त्वाखाली भारतानं गेल्या वर्षी कसोटी मालिकेत श्रीलंकेवर 2-1 असा तर दक्षिण आफ्रिकेवर 3-0 असा विजय साजरा केला होता. त्यामुळं विराट कोहलीच्या टीम इंडियाला कॅरिबियन बेटांवरच्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधल्या कसोटी मालिका विजयाची हॅटट्रिक साजरी करण्याची संधी आहे.