ठाणे : ठाणे महापालिकेत सत्ताधारी महायुतीकडूनच प्रशासनाची चिरफाड केल्याचं पाहायला मिळालं. ठाणे महापालिका मुख्यालयात महासभा झाली. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक मिलिंद पाटणकर यांनी गावदेवी मंडईतील गाळेवाटपाचा मुद्दा उपस्थित करुन नियमांना डावलण्यात आल्याचा आरोप केला, तर शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक अशोक वैती यांनी या आरोपांना दुजोरा देत गाळे वितरणात भ्रष्टाचार झाल्याचे सांगून दोषीवर कारवाईची मागणी केली.


 

टीएमटीचे चाक दिवसेंदिवस अधिक तोट्यात जात आहे. याकडे लक्ष वेधताना वैती यांनी खासगी बसेस टीएमटीचे प्रवासी पळवत असल्याचा मुद्दा उपस्थित केला.

 

पाणीपुरवठा विभागात केलेल्या भरती प्रकरणी घोटाळा झाल्याने सेना नगरसेवक संभाजी पंडित यांनी वर्षभरापूर्वी चौकशीची मागणी केली होती. तेव्हा तत्कालीन पीठासीन अधिकारी असलेले उपमहापौर साप्ते यांनी या भरती प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमून अहवाल देण्याचा निर्णय दिला होता. मात्र,एक वर्ष उलटले तरी अद्याप अहवालच आला नसल्याची कबुली खुद्द पीठासन अधिकारी साप्ते यांनी दिली.

 

सेनेच्याच महिला नगरसेविकानी विषय समित्या केवळ नामधारी असल्याचा आरोप केल्याने महायुतीतील रिपाईचे सदस्य रामभाऊ तायडे यांनी या सर्व समित्याच बरखास्त करण्याची उपरोधिक मागणी केली.

 

विरोधी पक्षनेते संजय भोईर यांच्या अग्निशमन दल प्रमुखपद सोडून सिडकोमध्ये स्थिरावलेल्या अरविंद मांडके यांच्या स्वेच्छानिवृत्तीच्या मुद्यावर प्रशासनाची कोंडी केली. मात्र प्रशासनाने थातूरमातूर उत्तरे देऊन वेळ मारून नेली.

 

ठाणे महापालिकेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष संपुष्टात आला असून सर्वसाधारण सभेत सत्ताधारी शिवसेना-भाजप महायुतीकडूनच पालिका प्रशासनाची चिरफाड केली जात आहे.