पोर्ट ऑफ स्पेन: भारत विरूद्ध वेस्ट इंडिजमधील पहिला एकदिवसीय सामना अखेर पावसामुळे रद्द झाला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे यांच्या अर्धशतकीच्या जोरावर 39 ओव्हर्समध्ये 3 विकेट 199 धावा केल्या होत्या. पण नंतर सामन्यामध्ये पावसानं व्यत्यय आणल्यानं उर्वरित सामना होऊ शकला नाही.
चॅम्पियन्स ट्रॉफीतील पराभवानंतर भारतीय संघ वेस्ट इंडिजमध्ये कशी कामगिरी करतं याकडेच सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. पण पहिल्याच सामन्यात पावसाची एंट्री झाल्यानं चाहत्यांची मात्र निराशा झाली.
दरम्यान, टॉस जिंकून वेस्ट इंडिजनं भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. यावेळी अजिंक्य रहाणे आणि शिखर धवन यांनी टीम इंडियाला चांगली सुरुवात दिली. दोघांनी अर्धशतकं झळकावली. पण यादेखील सामन्यात युवराज सिंह मात्र अपयशी ठरला. तो अवघ्या 4 धावा करुन बाद झाला. 39 षटकात भारतानं 199 धावांपर्यंत मजल मारली होती. पण त्यानंतर आलेल्या पावसामुळे अखेर सामना थांबवण्यात आला.