हैदराबाद | अजिंक्य रहाणे आणि रिषभ पंतनं पाचव्या विकेटसाठी रचलेल्या अभेद्य शतकी भागिदारीनं हैदराबाद कसोटीत भारताच्या पहिल्या डावाला मजबुती दिली आहे. या कसोटीत वेस्ट इंडिजनं पहिल्या डावात सर्व बाद 311 धावांची मजल मारली. त्यानंतर टीम इंडियानं दुसऱ्या दिवसअखेर चार बाद 308 धावा केल्या आहेत.
खेळ थांबला, त्या वेळी अजिंक्य रहाणे सहा चौकारांसह 75 धावांवर खेळत होता. रिषभ पंतनं दहा चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 85 धावा केल्या आहेत. त्या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 146 धावांची अभेद्य भागीदारी रचली आहे. त्याआधी, कर्णधार विराट कोहलीचं अर्धशतक पाच धावांनी हुकलं. पण त्यानं रहाणेच्या साथीनं चौथ्या विकेटसाठी साठ धावांची भागीदारी रचली. सलामीच्या पृथ्वी शॉनं 70 धावांची खेळी उभारून भारताच्या डावावर पुन्हा आपला ठसा उमटवला. त्यानं 53 चेंडूंमधली 70 धावांची खेळी अकरा चौकार आणि एका षटकारानं सजवली.
त्याआधी, आदल्या दिवशीच्या सात बाद 294 धावांवरून विंडीजचा पहिला डाव 311 धावांत आटोपला. विदर्भच्या उमेश यादवनं विंडीजच्या सहा फलंदाजांना माघारी धाडून हैदराबाद कसोटी गाजवली. त्यानं पहिल्या डावात 88 धावांत सहा विकेट्स घेतल्या. कसोटी कारकीर्दीत एका डावात पाच किंवा अधिक विकेट्स घेण्याची उमेश यादवची ही पहिलीच वेळ आहे.
रिषभ पंत आणि अजिंक्य रहाणेची शतकी भागिदारी, टीम इंडिया मजबूत स्थितीत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Oct 2018 05:40 PM (IST)
अजिंक्य रहाणे आणि रिषभ पंतनं पाचव्या विकेटसाठी रचलेल्या अभेद्य शतकी भागिदारीनं हैदराबाद कसोटीत भारताच्या पहिल्या डावाला मजबुती दिली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -