मुंबई : मॅट्रिमोनिअल वेबसाईट्सवरुन लग्नाचं आमिष दाखवत एका तरुणाला लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार मुंबईतील पवईमध्ये घडला आहे. जीवनसाथी डॉट कॉमच्या माध्यमातून ही फसवणूक झाली आहे.


पीडित तरुणाच्या तक्रारीवरुन पवई पोलिसांनी या प्रकरणी  32 वर्षीय महिलेच्या विरोधात कलम 420 अंतर्गत 23 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पवई पोलीस या प्रकरणातील तरुणीचा शोध घेत आहेत.

पीडित तरुण पवई आयआयटी जवळ रहाणारा असून तो एका प्रतिष्ठित कंपनी मध्ये कामाला आहे. गेले काही वर्षे तो लग्नासाठी मुलीच्या शोधात होता. जीवनसाथी डॉट कॉम या लग्न जुळवणाऱ्या वेबसाईट वर त्याने लग्नासाठी रजिस्टर केले होते. इथेच त्याची आरोपी राधिका दीक्षित या तरुणीशी ओळख झाली.

आपल्याला हवी तशीच मुलगी असल्याने तरुणाने तिला लग्नाची मागणी घातली. या महिलेने देखील त्याला होकार दिला. या दोघांच्यात ऑनलाइन अथवा मोबाईल वर गेल्या काही महिन्यापासून संभाषण सुरु होते. आरोपी राधिकाने तरुणाला अत्यंत विश्वासात घेऊन काही न काही कारणाने पैशांची मदत मागू लागली.

आपले वडील आजारी आहे, आई आजारी आहे अशा विविध कारणांनी तिने तरुणाकडून कधी ऑनलाइन बँक खात्यातून तर कधी चालक पाठवून रोख रक्कम महागडा मोबाईल उकळला. एवढ करुनही राधिका तरुणाला भेटण्यास समोर येत नव्हती.

वारंवार भेटण्याची विनंती केल्यानंतर अखेर राधिका तरुणाला भेटण्यास समोर आली आणि तरुणाला धक्काच बसला. कारण प्रोफाइल फोटोमध्ये असेलली तरुणी वेगळी होती तिचे नावसुद्धा वेगळे होते. या तरुणीकडे तरुणाने पैसे मागितले असता तिने देण्यास नकार दिला. अखेर याबाबत तरुणाने पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.