ठाणे : जीएसटीआडून राज्यातल्या महापालिकांची स्वायत्ता हिरावण्याचा डाव असल्याचं मत आज दोन्ही ठाकरे बंधूंनी व्यक्त केलं. आधी मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई पालिकेची स्वायत्ता अबाधित राखून जीएसटीप्रणालीच्या अंमलबजावणीस हरकत नसल्याचं मत व्यक्त केलं. त्यानंतर पदाधिकाऱ्यांच्या भेटीसाठी ठाण्यात आलेल्या राज ठाकरे यांनीही सरकारच्या भूमिकेवर संशय घेतला.


 
जीएसटीची करप्रमाणाली योग्य आहे, पण त्याच्या अंमलबजावणीमुळे राज्यातल्या सर्वच पालिकांच्या तिजोऱ्या रिकाम्या झाल्यानं त्यांना केंद्राकडे हात पसरावे लागतील, अशी भीती दोन्ही ठाकरे बंधूंनी व्यक्त केली. फक्त मुंबईच नाही, तर पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद अशा सर्वच पालिकांना केंद्राकडे हात पसरावे लागणार असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला.

 

 

गोविंदा पथकांच्या पाठीशी

गुन्हे दाखल झालेल्या गोविंदा पथकांची भेट राज ठाकरे यांनी घेतली. आम्ही नऊ थर लावून हंडी फोडलीच नाही, हंडी 20 फुटांवर होती, असं राज ठाकरे म्हणाले. गुन्हे दाखल झाले, यात मला नवीन काय, आम्ही गुन्हे दाखल झालेल्या मंडळांच्या पाठीशी आहोत, असंही राज यांनी स्पष्ट केलं.

मराठी माणूस वर चढण्यासाठी दुसऱ्या मराठी माणसाला खांदा देतो हे काय कमी आहे का, अशी मिश्कील टिपणी करतानाच दहीहंडीबाबत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कसा दाखल होऊ शकतो? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. हायकोर्टाने निर्णय द्यावा मत मांडू नये, असंही राज म्हणाले.

सण हा सणासारखाच साजरा झाला पाहिजे. कुठलाही सण साजरा करताना अतिरेक होणार नाही याची काळजी मंडळांनीही घेतली पाहिजे, पण एकदम सण बंद करा अस होऊ शकत
नाही, असंही मत राज यांनी व्यक्त केलं.

 
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा गुजरातीत ट्वीट

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गुजरातीत ट्वीट करतो, कमालच झाली, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनाही राज यांनी टोला लगावला. फडणवीसांनी सागरी कॉरिडॉरबाबत सीएमओचा गुजराती ट्वीट रिट्वीट केला होता.

अंत्ययात्रेत काय कराल?

100 पेक्षा जास्त माणसं एकत्र येणार असतील तर पोलिसांची परवानगी घ्यायची, तर मग अंत्यायात्रेला काय करायचं, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. अशावेळी किती जण येणार, कोणाला माहिती असतं, असं मत राज यांनी व्यक्त केलं.