मुंबई : 'पाच साल केजरीवाल' अशी घोषणा ज्याने दिली, त्यालाच अवघ्या तीन वर्षात राजकारणाला रामराम करावा लागला आहे. शनिवारी सुरु झालेल्या ट्विटर युद्धाचा अंत विशाल ददलानीच्या राजकीय संन्यासाने झाला आहे. पण या निमित्ताने राजकारणात धर्माचा प्रभाव किती असतो, हे प्रकर्षानं समोर आलं आहे.   'काही जण हरियाणाच्या विधानसभेत महिलांना जगण्याची पद्धत सांगणाऱ्या एका ऩग्न साधूचं समर्थन करण्यात व्यस्त आहेत. त्या साधूच्या अंगावर जितके कपडे आहेत, तितकेच त्याचे शिक्षण झाले आहे. मला नग्नतेबद्दल आक्षेप नाही, पण धर्माला राजसत्तेत आणण्यास आक्षेप आहे. काय करणार सध्या अच्छे दिन नाही... कच्छे दिन आले आहेत'     https://twitter.com/VishalDadlani/status/769490028787531776     https://twitter.com/VishalDadlani/status/769490564278550528     हरियाणाच्या विधानसभेत प्रवचन देणाऱ्या जैन मुनी तरुण सागर यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानं आप नेता, गायक आणि संगीतकार विशाल ददलानीला राजकारणातून संन्यास घ्यावा लागला.   हा सगळा प्रकार सुरु झाला शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास. हरियाणातल्या विधानसभेत प्रवचन देणाऱ्या तरुण सागर यांच्यावर आक्षेप घेत विशाल ददलानीने ट्वीट केलं. त्यानंतर जैन समुदायामधून टीकेचा भडिमार सुरु झाला. पण त्यानंतरही विशाल ददलानी आपल्या मुद्द्यावर ठाम राहिला. त्यामुळे जैन समुदायात संतापाची लाट उसळली.     अखेर या वादात आप नेता सत्येंद्र जैन यांना उतरावं लागलं. सत्येंद्र जैन यांनी तरुण सागर आणि अवघ्या जैन समुदायाची माफी मागितली. 'माझे सहकारी विशाल ददलानी यांच्या वक्तव्यामुळे जैन समुदायाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांची मी माफी मागतो. जैन मुनी तरुण सागर यांचीही मी माफी मागतो'     https://twitter.com/SatyendarJain/status/769575039545008129   पण या माफीनाम्यानंतरही विशाल ददलानी आणि पर्यायाने आपविरोधात संताप उसळतच होता. अखेर केजरीवालही मैदानात उतरले. 'मी गेल्याच वर्षी तरुण सागर यांची भेट घेतली. माझा अवघा परिवार नेहमी टीव्हीवर त्यांची प्रवचनं ऐकतो. त्यांच्या विचारांचा मी सन्मान करतो. तरुण सागर महाराज फक्त जैन समुदायासाठीच नाही, तर प्रत्येक समाजाचे सन्मानित संत आहेत. त्यांचा अवमान दुर्दैवी आहे.'     https://twitter.com/ArvindKejriwal/status/769579607934824449   खुद्द केजरीवाल यांनी माफीनामा धाडल्यानंतरही प्रक्षोभ शमला नाही. तेव्हा विशाल ददलानी यांनी जाहीर माफी मागून राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा केली. 'चूक झाली, मला माफ करा, पण कृपया देशाच्या भल्यासाठी राजकारणाला धर्माशी जोडू नका. मी राजकारणातून संन्यास घेत आहे'   https://twitter.com/VishalDadlani/status/769582082574155776   https://twitter.com/VishalDadlani/status/769794711154466816   https://twitter.com/VishalDadlani/status/769795595217272832   केजरीवाल यांना पाच साल देण्याचं आवाहन करणाऱ्या विशाल ददलानीला एका जैन मुनींविरोधात केलेल्या टिपण्णीनं राजकीय संन्यास घ्यावा लागला. या घटनेला गुजरातमधल्या आगामी निवडणुकांशीही जोडलं जातंय. जिथे जैन समुदाय महत्त्वाचा फॅक्टर ठरु शकतो. विशाल ददलानीच्या संन्यासामुळे आपला फार फरक पडेल असं वाटत नाही. पण या निमित्तानं राजकारणातली धर्माची ताकद मात्र दिसली.