अँटिग्वा : विराट कोहलीची टीम इंडिया वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी सज्ज झाली आहे. हा सामना अँटिग्वाच्या सर व्हिव्हियन रिचर्डस स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. आयसीसीने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवल्यानंतर टीम इंडिया पहिल्यांदाच कसोटी मालिका खेळणार आहे.


पहिल्या कसोटीआधीच्या सराव सामन्यात टीम इंडियाने विंडीज अ संघावर वर्चस्व गाजवलं होतं. चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेने फलंदाजीत कमाल केली होती. तर कुलदीप यादवची फिरकी प्रभावी ठरली होती. त्यामुळे अँटिग्वाच्या पहिल्या कसोटीत टीम इंडिया विंडीजवर वर्चस्व गाजवणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

1 ऑगस्ट रोजी बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन स्टेडियमवर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघांदरम्यान अॅशेस मालिकेतली पहिली कसोटी खेळवण्यात आली. या मालिकेपासून आयसीसीच्या टेस्ट चॅम्पियनशिपला सुरुवात झाली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मर्यादित षटकांच्या क्रिकेटची वाढलेली लोकप्रियता लक्षात घेता कसोटी क्रिकेटलाही नवी संजीवनी देण्याचा आयसीसीचा प्रयत्न आहे. यासाठीच टेस्ट चॅम्पियनशीप हे आयसीसीनं उचललेलं महत्वाचं पाऊल मानलं जात आहे.

कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत कसोटी मान्यता असलेल्या बारापैकी नऊ संघांचा सहभाग आहे. या नऊ संघांमध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, श्रीलंका, बांगलादेश, न्यूझीलंड, पाकिस्तान, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा समावेश आहे. 1 ऑगस्ट 2019 ते फेब्रुवारी 2021 दरम्यान या सर्व संघांमध्ये एकूण 27 मालिका खेळवल्या जातील. प्रत्येक संघ सहा कसोटी मालिका खेळेल. त्यात 72 कसोटी सामन्यांचा समावेश असेल. त्यातून पहिल्या दोन संघांमध्ये विजेतेपदासाठीचा सामना 10 ते 14 जून 2021 रोजी लंडनच्या लॉर्डसवर खेळवण्यात येणार आहे.

उद्यापासून भारत या टेस्ट वर्ल्डकपमधला पहिला सामना खेळणार आहे. 22 ते 26 ऑगस्टदरम्यान पहिला सामना तर 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबरदरम्यान जमैकामधील दुसरा सामना खेळवण्यात येणार आहे.

पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मयांक अग्रवाल, के.एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रोहित शर्मा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, उमेश यादव