अँटिग्वा : भारतीय क्रिकेट संघाने अँटिग्वामध्ये सुरु असलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेरीस 6 बाद 203 धावांची मजल मारली. टीम इंडियाची आघाडीची फळी सपशेल अपयशी ठरल्यानंतर उपकर्णधार अजिंक्य रहाणेने (81 धावा) जबाबदारीने फलंदाजी केली, त्यामुळे भारताने किमान 200 धावांचा टप्पा ओलांडला. गुरुवारी पहिल्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रात 68.8 षटकांचा खेळ झाला, तेव्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली. यानंतर पंचांनी खेळ थांबवण्याची घोषणा केली. त्यावेळी रिषभ पंत नाबाद 20 तर रवींद्र जाडेजाने नाबाद 3 धावा केल्या होत्या.


नाणेफेक हरल्यानंतर यजमान वेस्ट इंडिजने टीम इंडियाला फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं. परंतु भारताची सुरुवात अतिशय खराब झाली. वेस्ट इंडिज दौऱ्यातल्या पहिल्या कसोटीत यजमानांच्या वेगवान गोलंदाजांनी टीम इंडियाला चांगलंच हादरवलं. विंडीज गोलंदाजांनी सलामीच्या मयांक अगरवालसह (5 धावा) चेतेश्वर पुजारा (2 धावा) आणि विराट कोहली (9 धावा) या भरवशाच्या फलंदाजांना पहिल्या आठ षटकांत माघारी धाडलं. केमार रोशने अगरवाल आणि पुजारा यांना एकाच षटकात बाद केलं. मग शॅनॉन गॅब्रियलनं कर्णधार विराट कोहलीला स्थिरावण्याची संधी दिली नाही. पण सलामीवीर लोकेश राहुल आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या भारताचा डाव सावरला.

अडखळत सुरुवात झाल्यानंतर रहाणे नंतर आपल्या शानदार लयीमध्ये दिसला. त्याने 10 चौकारांच्या मदतीने 81 धावांची खेळी रचली. रहाणे आधी केएल राहुलसह (44 धावा) चौथ्या विकेटसाठी 68 धावांची, नंतर हनुमा विहारीसह (32 धावा) पाचव्या विकेटसाठी 82 धावांची भागीदारी केली.

भारताने उपाहारापर्यंत तीन विकेट्सच्या मोबदल्यात 68 धावा आणि चहापानापर्यंत चार विकेट्सच्या मोबदल्यात 134 धावा केल्या होत्या. चहापानानंतर खेळ सुरु झाल्यावर विहारी बाद झाला. केमार रोशने त्याला यष्टीरक्षक शाय होपच्या हाती झेलबाद केलं. वेस्ट इंडिजतर्फे केमार रोशने तीन, शॅनन ग्रॅबिएलने दोन आणि रोस्टन चेसने एक विकेट घेतली.