कोलकाता: श्रीलंकेविरुद्धच्या कोलकाता कसोटीत शतक ठोकून, भारताचा कर्णधार विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 शतकं नावावर केली आहेत. कोहलीचं आजचं कसोटीतील 18 वं शतक होतं. दुसरीकडे त्याची वन डे मध्ये 32 शतकं आहेत. अशी एकूण 50 शतकं कोहलीने झळकावली आहेत.

गेल्या नऊ वर्षांच्या कारकीर्दीत विराट कोहलीनं एक फलंदाज, एक कर्णधार आणि एक स्पोर्टस ब्रॅण्ड म्हणून गाठलेली उंची आपल्याला कधीच नाकारता येणार नाही.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या क्षितिजावर विराट कोहलीचा उदय झाला, त्या वेळी एक वांड मुलगा म्हणूनच त्याची अधिक ओळख झाली होती. त्याच्या अरेला कारे करण्याच्या वृत्तीला अनेकांनी नाकं मुरडली होती.

विराटची गुणवत्ता दिसत असूनही, त्याला थोरामोठ्यांच्या पंक्तीत बसवण्याची जाणकारांची तयारी नव्हती. पण २०१२ सालच्या आयपीएलमधल्या अपयशानं विराटच्या वृत्तीला... त्याच्या आयुष्याला शिस्तीचं वळण दिलं. म्हणूनच आजचा सुपर अॅथलीट विराट हा जगासाठी सुपर क्रिकेटर ठरला आहे.



शतकांचं अर्धशतक

विराट कोहली... वयाच्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय शतकांचं अर्धशतक साजरं करणारा फलंदाज

विराट कोहली... पन्नास आंतरराष्ट्रीय शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीतला आठवा फलंदाज

विराट कोहली... कसोटी क्रिकेटमध्ये अठरा शतकं साजरी करणारा फलंदाज

विराट कोहली... टीम इंडियाला कसोटी क्रमवारीत नंबर वन मिळवून देणारा फलंदाज आणि कर्णधारही...

विराट कोहली... वन डे फलंदाजांच्या क्रमवारीतला नंबर वन...

विराट कोहली... वन डेत नऊ हजार धावांचा पल्ला सर्वात जलद ओलांडणारा फलंदाज...

विराट कोहली... वन डेत सर्वाधिक शतकांच्या शर्यतीत आता नंबर दोनचा फलंदाज...

विराट कोहली... ट्वेन्टी ट्वेन्टी फलंदाजांच्या क्रमवारीतही नंबर वन आहे तो

विराट कोहलीनं कोलकाता कसोटीत कर्णधारास साजेशी खेळी करून आंतरराष्ट्रीय शतकांचं अर्धशतक साजरं केलं. त्याच्या या झुंजार खेळीनं टीम इंडियाला पराभवाच्या संकटातूनही वाचवलं.



विराट एक ब्रॅण्ड

फॉरमॅट कोणताही असो, क्रिकेटच्या मैदानात विराट कोहलीच्या यशाचा आलेख चढत्या भाजणीनं उंचावत आहे. आणि त्याचंच प्रतिबिंब जाहिरातींच्या दुनियेतही पडलेलं दिसत आहे. टीम इंडियाच्या कर्णधाराची ब्रॅण्ड व्हॅल्यूही त्याच्या नावाला साजेशी अशी विराट झाली आहे.

हेही वाचा -   विराट कोहली... फिटनेस... आणि बीप टेस्ट

फोर्ब्सच्या ताज्या आकडेवारीनुसार जगातल्या सर्वात महागड्या स्पोर्टस ब्रॅण्डच्या यादीत विराट कोहली सातव्या स्थानावर दाखल झाला आहे. गेल्या वर्षी या यादीत महेंद्रसिंग धोनी दहाव्या स्थानावर होता. त्यावेळी धोनीचं ब्रॅण्ड मूल्य भारतीय चलनात अंदाजे ७१ कोटी रुपये होतं. पण यंदा धोनीऐवजी विराटनं टॉप टेन स्पोर्टस ब्रॅण्डमध्ये स्थान मिळवलं आहे.

विराटचं ताजं ब्रॅण्ड मूल्य ९४ कोटी रुपये आहे. आणि विशेष म्हणजे त्याचं ब्रॅण्ड मूल्य स्टार फुटबॉलवीर लायनेल मेसीपेक्षाही दहा लाख डॉलर्सनी अधिक आहे. भारतीय चलनात ही रक्कम अंदाजे साडेसहा कोटी रुपयांच्या घरात जाते.

देखणा, सुपरफिट आणि यशस्वी

जाहिरातींच्या दुनियेत विराट कोहली हा स्पोर्टस ब्रॅण्ड यंदा लखलखताना दिसत आहे याचं कारण त्याच्या वाढत्या लोकप्रियेत दडलं आहे. अर्थात कुणाचीही लोकप्रियता ही अचानक वाढत नाही. त्यामागं काहीतरी सबळ कारणं असावी लागतात. जाणकार म्हणतात की, विराटनं अजूनही वयाची तिशी गाठलेली नाही. तो तरुण आहे... देखणा आहे... सुपरफिट आहे आणि यशस्वीही. विराटची आक्रमक देहबोली, त्याचा नीडरपणा ही वैशिष्ट्यं तरुणाईला आणि त्यातही मुलींना जास्त भावतात. त्यामुळंच त्याची लोकप्रियता ही सातत्यानं वाढताना दिसत आहे. साहजिकच विराट कोहली नावाच्या ब्रॅण्डला जगाच्या बाजारात आलेली किंमत ही त्यानं क्रिकेटच्या मैदानात मिळवलेलं यश आणि त्याची लोकप्रियता याचाच संगम आहे.



विराटचा फिटनेस

विराट कोहलीचं क्रिकेटच्या मैदानातलं यश आणि त्याची अमाप लोकप्रियता यामागं त्यानं गेल्या पाच वर्षांत जाणीवपूर्वक घेतलेली मेहनत आहे. टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांनी सुपर फिटनेसबाबत दिलेल्या सल्ल्यानं खरं तर विराटला उघडा डोळे, बघा नीटचा पहिल्यांदा साक्षात्कार झाला. पण २०१२ सालच्या आयपीएलच्या अपयशानंच त्याचे डोळे खरोखरच उघडले. तोवर विराटची फिटनेससाठीची मेहनत जेमतेमच होती. त्याच्या खाण्यापिण्यावर कसलंही बंधन नव्हतं. रात्री जागवूनही आपण हमखास चांगला परफॉर्मन्स देऊ शकतो ही त्याची मानसिकता होती. पण २०१२ सालच्या आयपीएलमधल्या अपयशानं विराटला खरोखरच जमिनीवर आणलं.

स्वत:ला बदललं

त्या दिवशी विराटनं स्वत:ला आरशात निरखून पाहिलं. आजच्या तुलनेत त्याचं वजन तब्बल ११-१२ किलोनं जास्त होतं. हे शरीर आणि चुकीच्या सवयी घेऊन आपण तिन्ही फॉरमॅट्मध्ये दीर्घकाळ वर्चस्व गाजवू शकणार नाही, याची विराटला जाणीव झाली आणि त्यानं स्वत:ला बदलायचं ठरवलं.



तो रोज दीड तास जिममध्ये मेहनत घेऊ लागला. त्यानं खाण्यापिण्यावर सक्त बंधनं आणली. तो फक्त सकस आहार घेऊ लागला. शीतपेयं, आईस्क्रीम यावर तर त्यानं फुलीच मारली. विराटला बदललेल्या मानसिकतेचे रिझल्ट्स तातडीनं मिळाले. मग २०१५ साली त्यानं आपला व्यायाम आणखी वाढवला. एखाद्या वेटलिफ्टरला साजेसं हेवी वेटट्रेनिंगही त्याच्या व्यायामाचा भाग बनलं. याच कठोर मेहनतीनं विराटला एक सुपर अॅथलीट बनवलंय.

विराट कोहलीमधला सुपर अॅथलीटच आज त्याला यशाच्या आणि लोकप्रियतेच्याही शिखरावर घेऊन गेला आहे.

विजय साळवी, एबीपी माझा, मुंबई

संबंधित बातम्या

कसं बदललं विराट कोहलीचं आयुष्य?