कोलकाता : कोलकात्याच्या ईडन गार्डन्सचं रणांगण सज्ज झालं आहे भारत आणि श्रीलंका संघांमधल्या पहिल्या लढाईसाठी. उभय संघांमधलं हे युद्ध आहे तीन कसोटी सामन्यांचं. त्यातली पहिली लढाई कोलकात्यात, दुसरी लढाई नागपुरात तर तिसरी लढाई दिल्लीत रंगणार आहे.
विराट कोहलीच्या टीम इंडियानं श्रीलंका दौऱ्यातल्या कसोटी मालिकेत श्रीलंकेला ३-० असं चारीमुंड्या चीत केलं होतं. त्याच श्रीलंकेशी मायदेशातल्या कसोटी मालिकेत खेळताना भारतीय शिलेदारांचा आत्मविश्वास दुणावलेला असेल. पण क्रिकेटच्या मैदानात प्रतिस्पर्धी कितीही दुबळा असला तरी त्याला कमी लेखायचं नसतं, हे विराट कोहली आणि त्याच्या शिलेदारांना लक्षात ठेवावं लागेल.
दिनेश चंडिमलच्या याच श्रीलंकेनं पाकिस्तानचा नुकताच २-० असा धुव्वा उडवला आहे. पाकिस्तानवरच्या त्या विजयानं श्रीलंकेलाही नवा आत्मविश्वास मिळवून दिला आहे. त्यामुळं भारतीय संघाला आता आत्मविश्वास उंचावलेल्या श्रीलंकेचा सामना करायचा आहे.
ईडन गार्डन्सवरच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या निमित्तानं टीम इंडिया तीन महिन्यांनी पाच दिवसांचं क्रिकेट खेळणार आहे. जुलै-ऑगस्टमधल्या श्रीलंका दौऱ्यानंतर भारतीय संघ कसोटी क्रिकेट खेळलेला नाही. गेल्या तीन महिन्यांमध्ये विराटसेना तेरा वन डे आणि सहा ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांमध्ये खेळली आहे. पण यंदाच्या मोसमातल्या रणजी सामन्यांचा अनुभव बहुतेक शिलेदारांच्या गाठीशी आहे. त्यामुळं पाच दिवसांच्या क्रिकेटशी जुळवून घेण्यात टीम इंडियाला अडचण येणार नाही.
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात श्रीलंका संघ आजवर भारतात सतरा कसोटी सामन्यांमध्ये सहभागी झाला आहे. पण त्यापैकी एकही कसोटी श्रीलंकेला जिंकता आलेली नाही. भारतानं सतरापैकी दहा कसोटी सामने जिंकले असून, उभय संघांमधल्या सात कसोटी अनिर्णीत राहिल्या आहेत.
दिनेश चंडिमलचा तुलनेत दुबळा संघ अपयशाची ती कोंडी फोडू शकेल का?, याविषयी जाणकारांच्या मनात शंका आहे. भारत दौऱ्यातल्या कसोटी मालिकेत श्रीलंकेची मदार ही प्रामुख्यानं अष्टपैलू अँजलो मॅथ्यूज आणि डावखुरा स्पिनर रंगाना हेराथ यांच्यावरच अवलंबून आहे. पण केवळ त्या दोन शिलेदारांच्या जीवावर श्रीलंका संघ भारत दौऱ्यात मोठा चमत्कार घडवणं संभवत नाही.
श्रीलंकेच्या दृष्टीनं ईडन गार्डन्सवर आशेची एकच बाब म्हणजे कोलकात्याच्या या कसोटीवर पहिले तीन दिवस पावसाचं सावट आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं बुधवारी सकाळी कोलकात्यात पाऊस झाला. पुढच्या तीन दिवसांतही कोलकात्यात अधूनमधून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोलकात्यातल्या हवामानाचा हा अंदाज लक्षात घेऊन भारतीय संघात भुवनेश्वर कुमार, उमेश यादव आणि मोहम्मद शमी या तीन वेगवान गोलंदाजांचा, तर रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजा या दोन फिरकी गोलंदाजांचा समावेश होण्याची चिन्हं आहेत. टीम इंडियाची ही आक्रमक रणनीती अर्थातच पावसावर आणि श्रीलंकेवरही विजय मिळवण्याच्या दिशेनं उचललेलं पाऊल असेल.
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी टीम इंडिया सज्ज
सिद्धेश कानसे, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
15 Nov 2017 04:39 PM (IST)
विराट कोहलीच्या टीम इंडियानं श्रीलंका दौऱ्यातल्या कसोटी मालिकेत श्रीलंकेला ३-० असं चारीमुंड्या चीत केलं होतं. त्याच श्रीलंकेशी मायदेशातल्या कसोटी मालिकेत खेळताना भारतीय शिलेदारांचा आत्मविश्वास दुणावलेला असेल. पण क्रिकेटच्या मैदानात प्रतिस्पर्धी कितीही दुबळा असला तरी त्याला कमी लेखायचं नसतं, हे विराट कोहली आणि त्याच्या शिलेदारांना लक्षात ठेवावं लागेल.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -