कॅण्डी (श्रीलंका) : विराट कोहलीच्या टीम इंडियाला कॅण्डीची तिसरी कसोटी जिंकून श्रीलंका दौऱ्यात नवा इतिहास घडवण्याची संधी आहे. भारतानं श्रीलंका दौऱ्यातली तीन कसोटी सामन्यांची मालिका 3-0 अशी जिंकली, तर कसोटी क्रिकेटच्या इतिहासात टीम इंडियाचा हा परदेश दौऱ्यातला पहिला क्लीन स्विप ठरेल.
गॉल कसोटीत भारताचा 304 धावांनी दणदणीत विजय, कोलंबो कसोटीत भारताची एक डाव आणि 53 धावांनी सरशी. इजा झाला, बिजा झाला आणि आता विराट कोहलीची टीम इंडिया सज्ज झाली आहे तिजासाठी. म्हणजे विजयी हॅटट्रिकसाठी!
भारत आणि श्रीलंका संघांमधला तिसरा आणि अखेरचा कसोटी सामना कँडीच्या पल्लिकल स्टेडियमवर खेळवण्यात येत असून ही कसोटी जिंकून तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 3-0 असा निर्विवाद विजय मिळवण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न आहे. भारतानं कसोटी क्रिकेटच्या 85 वर्षांच्या इतिहासात आजवर कधीही परदेशात निर्विवादरित्या मालिका जिंकलेली नाही. त्यामुळं टीम इंडियाचा श्रीलंकेतला 3-0 असा विजय विराट कोहलीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारा ठरेल.
आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत अनुक्रमे पहिल्या आणि सातव्या स्थानावर असलेल्या भारत आणि श्रीलंका संघांच्या ताकदीत किती मोठा फरक आहे याची कल्पना आधी गॉल आणि मग कोलंबोच्या मैदानात आली. या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियानं पहिल्या डावात सहाशेहून अधिक धावांचा डोंगर उभारला, तिथंच या कसोटी सामन्यांची सूत्रं भारताच्या हाती आली होती. आता कँडीच्या तिसऱ्या कसोटीतही धावांचा डोंगर उभारण्यासाठी भारतीय फलंदाजांचे हात शिवशिवत असतील.
भारतीय फलंदाजांनी लागोपाठ दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवलं असलं तरी, श्रीलंकेच्या कुशल मेंडिस आणि दिमुथ करुणारत्नेनं झुंजार शतकं झळकावून कोलंबो कसोटीत पराभव टाळण्यासाठी केलेली शिकस्त विसरता येणार नाही. मेंडिस आणि करुणारत्नेच्या त्या शतकांनी श्रीलंकेच्या फलंदाजांना नक्कीच नवा आत्मविश्वास दिला असेल. त्यात रवींद्र जाडेजाला शिस्तभंगाच्या कारवाईमुळं तिसऱ्या कसोटीतून घ्यावी लागलेली माघार श्रीलंकन फलंदाजांच्या पथ्यावर पडावी.
रवींद्र जाडेजा हा पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधला भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. जाडेजानं 374 धावांच्या मोबदल्यात श्रीलंकेच्या 13 फलंदाजांना माघारी धाडलं आहे. कोलंबो कसोटीत तर तो भारताच्या विजयाचा प्रमुख शिल्पकार ठरला. त्यानं नाबाद 70 धावांची खेळी आणि 236 धावांत सात विकेट्स अशी अष्टपैलू कामगिरी बजावली. पण याच कसोटीत जाडेजानं स्वत:च्या गोलंदाजीवर अडवलेला चेंडू फलंदाज करुणारत्नेच्या दिशेनं अतिशय धोकादायक पद्धतीनं थ्रो केला होता. त्यामुळं आयसीसीच्या नियमावलीनुसार त्याच्यावर एका कसोटीतून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. परिणामी तो कँडीच्या तिसऱ्या कसोटीत तो खेळू शकणार नाही.
रवींद्र जाडेजाऐवजी कँडी कसोटीसाठी डावखुरा स्पिनर अक्षर पटेलचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. पण या कसोटीसाठी चायनामन गोलंदाज कुलदीप यादवलाच अंतिम अकरा जणांत संधी मिळण्याची चिन्हं आहेत. तसं झालं तर कुलदीप यादवची ही दुसरी कसोटी ठरेल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या धर्मशाला कसोटीतल्या पदार्पणातच त्यानं भारताच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली होती. त्या कसोटीच्या पहिल्या डावात कुलदीप यादवनं 68 धावांत 4 विकेट्स काढल्या होत्या.
कुलदीप यादवनं धर्मशाला कसोटीत ऑस्ट्रेलियासमोर प्रभावी कामगिरी बजावली, त्या वेळी त्याच्या साथीला रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजा ही अनुभवी जोडीही होती. त्यामुळं दुसऱ्या डावात कुलदीप अयशस्वी ठरला, त्या वेळी त्या दोघांनी भारतीय आक्रमणाची जबाबदारी यशस्वीरित्या पेलली होती. आता रवींद्र जाडेजाच्या अनुपस्थितीत टीम इंडियाला जिंकून देण्याची मोठी जबाबदारी कुलदीप यादवच्या शिरावर आहे.