मुंबई : गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांवरील आरोपांची चौकशी लोकायुक्तांमार्फत करणार असल्याचं, आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिलं. तसेच आपल्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करु नका, असा इशारा विरोधकांना दिला.


गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोपांवरुन विधान परिषदेत विरोधकांनी दोन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. शिवाय या दोन्ही मंत्र्यांची उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांमार्फत चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी केली.

पण विरोधकांची मागणी फेटाळून लावत, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अशा चौकशीसाठी उपलब्ध होत नसल्याचं सभागृहाला सांगितलं. तसेच लोकायुक्त हे उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीशच आहेत. त्यामुळे मेहतांची चौकशी लोकायुक्तांमार्फत करणार असल्याचंही आश्वासन त्यांनी यावेळी सभागृहाला दिली.

दुसरीकडे उद्योगमंत्री सुभाष देशमुख यांच्या राजीनाम्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील तटकरे आणि शिवसेना आमदार यांच्यात खडाजंगी झाली. सुभाष देशमुख हे शिवसेनेचे असल्याने, मुख्यमंत्री सरकार वाचवण्यासाठी मित्र पक्षांतील मंत्र्यांना अभय देत असल्याचा आरोप केला. त्यावर अनिल परब यांनी कुणालाही वाचवण्याचा प्रश्न नाही असं म्हणत, राष्ट्रवादीचे अदृश्य हात मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी असल्याचा पलटवार केला.

काय आहेत प्रकाश मेहतांवर एसआरए घोटाळ्याचा आरोप?

मुंबईतील ताडदेवमधल्या एम. पी. मिल कम्पाऊंड येथील एसआरए प्रकल्पात एफएसआय घोटाळा केल्याचा आरोप गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यावर आहे. विकासकाला फायदा देण्यासाठी प्रकाश मेहता यांनी नियम बाजूला ठेवून एफएसआय अन्यत्र वापरास मंजुरी दिल्याचा आरोप होत आहे.

3K च्या नियमात एका विकासकाला फायदा देण्यासाठी धोरण ठरवता येत नसल्याचं कारण सांगत गृहनिर्माण विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांनी प्रस्तावाला विरोध केला होता. तसंच पीएपी (प्रकल्पबाधितांची घरं) संदर्भातही प्रस्तावावरही त्यांनी प्रतिकूल शेरा मारला होता.

पण मेहता यांनी ही फाईल मंजूर करताना मुख्यमंत्र्यांना अवगत केल्याचा शेरा मारला होता.

संबंधित बातम्या

मुख्यमंत्र्यांचा पारदर्शक कारभार कुठे आहे?: धनंजय मुंडे

सुभाष देसाईंनी 400 एकर जमीन बिल्डरच्या खिशात घातली : धनंजय मुंडे

विरोधकांनी आरोप केले म्हणून राजीनामा देणार नाही : प्रकाश मेहता

मेहतांच्या राजीनाम्याची मागणी राजकीय हेतूने : मुख्यमंत्री

'माझा'च्या बातम्यांवर सभागृहात घमासान, प्रकाश मेहता-मोपलवारांना हटवण्याची मागणी

मुख्यमंत्र्यांना न सांगताच 'अवगत' शेरा, प्रकाश मेहतांच्या चौकशीचे आदेश