नवी दिल्ली : श्रीलंकेविरुद्धच्या फिरोजशाह कोटला स्टेडियममधील तिसऱ्या कसोटीत मुरली विजयपाठोपाठ कर्णधार विराट कोहलीनेही शानदार शतक झळकावलं. विराटचं कसोटी कारकीर्दीतलं हे विसावं तर या मालिकेतलं सलग दुसरं शतक ठरलं.

विराटने 110 चेंडूंचा सामना करताना चौदा चौकारांसह शतक साजरं केलं. या दोघांनी मिळून तिसऱ्या विकेटसाठी 175 पेक्षा जास्त धावांची अभेद्य भागीदारी रचली.

त्याआधी सलामीवीर मुरली विजयने आपल्या कसोटी कारकीर्दीतलं अकरावं शतक साजरं केलं. त्याने 170 चेंडूत 9 चौकारांसह नाबाद 101 धावांची खेळी उभारली. तर विराट 14 चौकारांसह 94 धावांवर खेळत आहे.

सलामीचा शिखर धवन आणि चेतेश्वर पुजारा स्वस्तात माघारी परतल्यानंतर विजय आणि कर्णधार  कोहलीनं खेळाची सूत्रं आपल्या हातात घेत टीम इंडियाला पहिल्या डावात मजबूत स्थितीत नेऊन ठेवलं आहे.



टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय

दिल्लीच्या फिरोजशहा कोटला स्टेडियमवर होत असलेल्या या कसोटीत विराट कोहलीने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

शिखर धवन आणि मुरली विजय यांनी भारताच्या डावाला सुरुवात केली. मात्र धवनला मोठी खेळी करता आली नाही. धवन 23 धावा करुन माघारी परतला. त्यानंतर मग मुरली विजयच्या साथीला चेतेश्वर पुजारा आला, पण पुजाराही जास्त वेळ मैदानात थांबला नाही. त्यानेही 23 धावाच केल्या.

धवनला परेराने तर पुजाराला गॅमेजने माघारी धाडलं. धवन-पुजार माघारी परतल्यानंतरही मुरली विजयने मात्र एक बाजू लावून धरली. त्याने संयमी खेळी करत कर्णधार विराट कोहलीसोबत शतक पूर्ण केलं.

भारतीय संघात दोन बदल

भारताने संघात दोन बदल केले आहेत. सलामीवीर शिखर धवन आणि मोहम्मद शमी संघात परतले आहेत, तर के एल राहुल आणि उमेश यादव यांना वगळण्यात आलं.

तर श्रीलंकेनेही त्यांच्या संघात तीन बदल केले आहेत. लक्षन संदाकन, रोशन सिल्वा आणि धनंजय डीसिल्व्हा यांना संघात स्थान देण्यात आला आहे, तर थिरीमन्ने, शनाका आणि रंगना हेरथ यांना वगळण्यात आलं आहे.

टीम इंडियाने दुसरी कसोटी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

त्याआधी, कोलकात्याच्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाला केवळ अंधुक प्रकाशामुळेच विजयाने हुलकावणी दिली होती. या पार्श्वभूमीवर दिल्ली कसोटीवर विराटसेनेच्याच वर्चस्वाची अपेक्षा आहे.

पण या कसोटीसाठी सलामीचा तिढा सोडवायचा कसा हा प्रश्न विराट कोहली समोर  होता. कारण वैयक्तिक कारणास्तव दुसऱ्या कसोटीतून माघार घेणारा शिखर धवन तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात परतला.

पण धवनच्या अनुपस्थितीत संधी मिळालेल्या मुरली विजयने नागपूर कसोटीत शतक ठोकलं होतं. त्यामुळे धवनच्या साथीला लोकेश राहुल की विजय यापैकी कुणाला संधी द्यायची हा प्रश्न होता.