गुवाहाटी : विराट कोहलीची टीम इंडिया यंदाच्या कॅलेंडर वर्षातला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. गुवाहाटीमध्ये भारत आणि श्रीलंका संघांदरम्यान हा ट्वेन्टी ट्वेन्टी सामना खेळवण्यात येणार आहे. उभय संघातल्या तीन ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेतल्या या पहिल्या सामन्याला संध्याकाळी सात वाजता सुरुवात होईल. या मालिकेसाठी टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे. पण पाठीच्या दुखापतीमुळे संघाबाहेर गेलेल्या जसप्रीत बुमराच्या पुनरागमनामुळे भारतीय गोलंदाजीची फळी मजबूत झाली आहे. या मालिकेतला दुसरा सामना इंदूर तर तिसरा सामना पुण्यात खेळवण्यात येईल.


टीम इंडिया आणि श्रीलंका दोन्ही संघ वर्षाची सुरुवात विजयी सलामीने करण्याचा प्रयत्न करतील. रोहित शर्माच्या गैरहजेरीत शिखर धवन आणि लोकेश राहुल यांच्यावर टीम इंडियाला चांगली सुरुवात करून देण्याची जबाबदारी असणार आहे. या सामन्यात सर्वांच्या नजरा दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या जसप्रीत बुमरा, शिखर धवन यांच्यावर असणार आहेत. सामन्याआधी दोन्ही संघांनी मैदानात जोरदार सराव केला.


संभाव्य संघ


भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, संजू सॅमसन, ऋषभ पंत (विकेटकीपर), शिवम दुबे, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी आणि वॉशिंग्टन सुंदर.


श्रीलंका : लसिथ मलिंगा (कर्णधार), धनुष्का गुणतिलक, अविष्का फर्नांडो, अँजेलो मॅथ्यूज, दासुन शनाका, कुसल परेरा, निरोशन डिकवेला, धनंजय डिसिल्व्हा, इसुरु उडाना, भानुका राजपक्षे, ओशदा फर्नांडो, वानिंदु हसरंगा, लाहिरु कुमारा, कुसल मेंडिस, लक्षण संदाकन आणि कसून राजिता.