औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा परिषदेमध्ये कायदेशीर पेच निर्माण झाल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडीच्या नाट्यावर दहा वर्षाच्या मुलाने पडदा टाकला. समर्थ मिटकर असा या मुलाचं नाव आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना बंडखोर नेत्या देवयानी डोनगावकर आणि काँग्रेसच्या उमेदवार मीना शेळके यांच्यामध्ये खरी लढत होती. दोघींनाही ही 30-30 मतं पडली. आता काय करायचे हा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चिठ्ठी काढून विजयी उमेदवारांची घोषणा करण्याचा निर्णय घेतला. अवघ्या दहा वर्षाच्या समर्थ मिटकरला बोलावण्यात आलं आणि त्याने मीना शेळके यांची चिठ्ठी काढली. मीना शेळके यांनी या मुलास पाचशे रुपये बक्षीस दिले तर चंद्रकांत खैरे यांनी त्या मुलाचा सत्कार केला.


औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीत मोठा ट्विस्ट निर्माण झाला होता. कारण, अध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या किंबहुना काँग्रेसच्या मीना शेळके विजयी झाल्या आहेत. तर उपाध्यक्षपदाची माळ भाजपच्या एल.जी. गायकवाड यांच्या गळ्यात पडलीय. त्यामुळं औरंगाबाद जिल्हा परिषदेत अध्यक्ष काँग्रेसचा तर उपाध्यक्ष भाजपचा असं चित्र पाहायला मिळतंय.

हेही वाचा- माझ्या राजीनाम्याच्या पुड्या सोडल्या जात आहेत; अब्दुल सत्तार यांचं घुमजाव

अध्यक्षपदासाठी मीना शेळके आणि शिवसेनेच्या बंडखोर आणि भाजप पुरस्कृत दिवयानी डोणगावकर यांना 30-30 अशी समान मतं मिळाली. पण चिठ्ठी काढून काँग्रेसच्या मीना शेळके विजयी झाल्या. तर उपाध्यक्षपदासाठी भाजपच्या गायकवाड यांना 32 तर महाविकास आघाडीच्या शुभांजी काजे यांना 28 मतं मिळाली आहेत. कोल्हापूर, नाशिकनंतर आता औरंगाबाद जिल्हा परिषद महाआघाडीने ताब्यात घेतली आहे.

अब्दुल सत्तार यांच बंड शमलं -
शिवसेनेचे आमदार आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी बंड पुकारलं होतं. राज्यमंत्रीपद दिल्याने ते नाराज असल्याचे बोलले जात होते. सोबत औरंगाबाद जिल्हा परिषद शिवसेनेकडे असावी, असंही त्यांचं म्हणणं होतं. मात्र, याठिकाणी काँग्रेचा उमेदवार दिल्याने नाराजी व्यक्त करत त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, हे नाराजी नाट्य संपलं असून अब्दुल सत्तार नाराज नसल्याचं माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी सांगितलं. अब्दुल सत्तार यांनी आपल्या राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने महाविकास आघाडी सरकारमध्ये मोठी खळबळ उडाली होती. अब्दुल सत्तार यांची मनधरणी करण्याची जबाबदारी माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यावर सोपवण्यात आली होती. त्यानुसार अब्दुल सत्तार आणि अर्जुन खोतकर यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीनंतर अब्दुल सत्तार राजीनामा देणार नाहीत, असं अर्जुन खोतकर यांनी बैठकीनंतर सांगितलं. औरंगाबाद जिल्हा परिषदेची सत्ता शिवसेनेकडे ठेवावी यासाठी अब्दुल सत्तार आग्रही होते. मात्र, त्यांना स्थानिक नेत्यांनी काहीही विचारलं नाही, त्यामुळे सत्तारांची नाराजी होती.
औरंगाबाद जिल्हा परिषदेत ट्विस्ट; काँग्रेसचा अध्यक्ष, तर भाजपचा उपाध्यक्ष