पुणे : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 7 वेळा द्विशतकं ठोकणारा विराट कोहली हा पहिला भारतीय फलंदाज बनला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या पुण्यात सुरु असलेल्या दुसरे कसोटी सामन्यात विराट कोहलीच्या ऐतिहासिक खेळीमुळे भारत मजबूत स्थितीत पोहोचला आहे.


कर्णधार विराट कोहलीच्या द्विशतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने पुणे कसोटीत आपला पहिला डाव पाच बाद 601 धावांवर घोषित केला. विराटने 336 चेंडूत 33 चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 254 धावांची खेळी उभारली. विराटचं आजवरच्या कारकीर्दीतलं हे सातवं द्विशतक ठरलं. त्यासोबतच त्याने सात हजार कसोटी धावांचा टप्पाही ओलांडला.

मयांकचं शतक तर जाडेजाची 91 धावांची खेळी
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन कसोटी सामन्यांतील दुसरा सामना पुण्याच्या एमसीए स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी उतरलेल्या भारतीय संघाने 5 विकेट्सच्या मोबदल्यात 601 धावा केल्या आणि पहिला डाव घोषित केला. विराट कोहलीने नाबाद 254 धावा केल्या. रविंद्र जाडेजाने 91 धावांची खेळी केली. याशिवाय सलामीवीर मयांक अग्रवालने 195 चेंडूत 108 धावा केल्या. पुजाराने 112 धावांवर नऊ चौकारांच्या मदतीने 58 धावा केल्या.

IND Vs SA | कर्णधार विराट कोहलीचं शतक, रिकी पॉण्टिंगच्या विक्रमाशी बरोबरी

कसोटीत कोहलीचं सातवं द्विशतक
भारताकडून सर्वाधिक द्विशतकं ठोकण्याचा मान आता विराटने मिळवला आहे. याआधी वीरेंद्र सेहवागने सहा द्विशतकं झळकावण्याचा पराक्रम गाजवला होता. विशेष म्हणजे विराटने सातही द्विशतकं कर्णधार म्हणून केली आहे. कर्णधार म्हणून सर्वाधिक द्विशतक करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट अव्वल स्थानावर आहे. या यादीत वेस्ट इंडिजचा महान क्रिकेटपटू ब्रायन लारा पाच द्विशतकांसह दुसऱ्या स्थानावर आहे.