सोलापूर : सोलापूरतील अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील प्रतिस्पर्धी उमेदवारांनी एकत्रित बसून जेवण केलं. काँग्रेसचे उमेदवार आमदार सिद्धराम म्हेत्रे आणि भाजपचे उमेदवार सचिन कल्याणशेट्टी यांनी सोबत भोजन केल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. अक्कलकोट तालुक्यातील बसवलिंगेश्वर महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त दोन्ही उमेदवार नागणसुर येथील मठात आले होते. त्यावेळी दोघांनीही शेजारी बसून जेवण केलं.
यावेळी दोन्ही उमेदवारांनी एकमेकांना शुभेच्छा देखील दिल्या. विधानसभा निवडणुकीत अक्कलकोट तालुक्यात म्हेत्रे आणि कल्याणशेट्टी यांच्यात चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. नागणसूर गावातील मतं ही नेहमीच निर्णायक ठरत असतात त्यामुळे पुण्यतिथीचे निमित्त साधत दोन्ही उमेदवारांनी गावाला भेट दिली आणि मतदारांना मतांची साद घातली. निवडणुकांमध्ये प्रतिस्पर्ध्यांवर टीकेची झोड उठवण्याची एकीकडे परंपरा असताना म्हेत्रे आणि कल्याणशेट्टींच्या या सहभोजनाची चांगलीच चर्चा होत आहे. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच वायरल होत आहेत.
1997 पासून अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचं राजकारण हे पूर्णत: सिद्धाराम म्हेत्रेंच्या अवती भवती घुमत आहे. 1997 च्या पोटनिवडणुकीतून म्हेत्रे यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर 2009 ची विधानसभा वगळता त्यांनी अक्कलकोटमधून काँग्रेसला नेतृत्व दिलं. म्हेत्रे यांचा 2009 ला पराभव करणारे भाजपचे सिद्रामप्पा पाटील यांच्यात आडवे विस्तव जात नव्हते. 2014 पर्यंत म्हेत्रे आणि पाटील या दोघांमध्ये मोठी राजकीय खुन्नस होती. 2014 नंतर काही कारणांसाठी सिद्रामप्पा पाटील हे भाजपपासून दुरावले आणि एकमेकांचे राजकीय हाडवैर असलेले म्हेत्रे-पाटील एकत्रित आले.
त्यामुळे त्यांच्यासमोर आता कोणाचा निभाव लागणार नाही असे अक्कलकोट तालुक्यात मतदारांचा सूर होता. मात्र याच दरम्यान भाजपतर्फे सचिन कल्याणशेट्टी यांनी संघटनात्मक कार्यावर भर दिला. नगरपरिषदा, पंचायत समिती, बाजार समिती निवडणुकांत भाजपला अपेक्षेपेक्षा चांगले यश मिळाले. या साऱ्याचं श्रेय स्थानिक भाजप नेते सचिन कल्याणशेट्टीला दिलं जातं. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसचे विद्यमान आ. सिद्धाराम म्हेत्रे आणि भाजपाकडून सचिन कल्याणशेट्टी यांच्यात होत असलेली ही लढाई चुरशीची होणार असल्याचे चित्र आहे.
हे देखील वाचा - अक्कलकोट विधानसभा | स्वामींच्या नगरीत अभय कुणाला? भाजप आणि काँग्रेसमध्ये कांटे की टक्कर
अक्कलकोटमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारांचा मांडीला मांडी लावून भोजनावर ताव
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Oct 2019 02:03 PM (IST)
निवडणुकांमध्ये प्रतिस्पर्ध्यांवर टीकेची झोड उठवण्याची एकीकडे परंपरा असताना म्हेत्रे आणि कल्याणशेट्टींच्या या सहभोजनाची चांगलीच चर्चा होत आहे. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच वायरल होत आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -