उल्हासनगर : आम्ही उल्हासनगरात भाजपला मदत केली, त्यावेळी आम्हाला आमदारकीचं आश्वासन देण्यात आलं होतं. पण मुख्यमंत्र्यांनी आम्हाला ऐनवेळी दगा दिला, अशा शब्दात उल्हासनगरच्या आमदार ज्योती कलानी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.


उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीत कलानी परिवाराने भाजपची मदत केल्यामुळे शहरात भाजपची सत्ता आली. त्यावेळी आमच्या कौटुंबिक अडचणी होत्या, त्यामुळे आम्ही मदत केली. मात्र आमदारकी तुम्हालाच देऊ, असं आश्वासन त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. त्यानुसार विद्यमान महापौर पंचम ओमी कलानी यांचं नाव निश्चितही झालं होतं. मात्र शेवटच्या क्षणी आम्हाला डावलून दुसऱ्याला उमेदवारी देण्यात आली. त्यामुळं आमच्यावर अन्याय झाला असून मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दगा दिल्याची भावना ज्योती कलानी यांनी व्यक्त केल्या.

विशेष म्हणजे ज्योती कलानी या राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार असून यंदा सुनेला किंवा मुलाला भाजपकडून तिकीट मिळण्याची खात्री असल्यानं त्यांनी राष्ट्रवादीचा राजीनामाही दिला होता. मात्र भाजपनं दगा दिल्याने आपण पुन्हा राष्ट्रवादीतून उमेदवारी घेतल्याचं ज्योती कलानी यांनी स्पष्ट केलं.

उल्हासनगरचे सलग चार वेळा आमदार राहिलेले आणि सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले पप्पू कलानी यांच्या ज्योती कलानी या पत्नी आहेत. पप्पू कलानी यांना शिक्षा झाल्यानंतर ज्योती कलानी राष्ट्रवादीतर्फे उल्हासनगरमधून निवडून आल्या होत्या. मात्र नंतर त्यांचे पुत्र ओमी कलानी यांनी महापालिकेत भाजपशी घरोबा केला. ओमी हे भाजपतर्फे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठीही इच्छुक होते. मात्र शेवटच्या क्षणी आम्हाला डावलून कलानींचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जाणारे कुमार आयलानी यांना उमेदवारी देण्यात आली.

आयलानींना उमेदवारी दिल्यानं ओमी कलानी यांनी ऐनवेळी राष्ट्रवादीतून अर्ज भरला आहे. ओमी कलानी यांची पत्नी पंचम कलानी या उल्हासनगर महापालिकेच्या भाजपच्या महापौर असून त्या ओमी यांच्या प्रचारात दिसल्या तर त्यांच्यावर कारवाई करू, असा इशारा भाजप जिल्हाध्यक्ष आणि उमेदवार कुमार आयलानी यांनी दिला आहे. तर अशा कारवायांना आम्ही घाबरत नसून महापौरपद सोडून देऊ, अशी भूमिका ओमी कलानी आणि पंचम कलानी यांनी घेतली आहे.