जोहान्सबर्ग : विराट कोहलीची टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यात एक नवा इतिहास घडवण्यासाठी सज्ज झाली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमधली चौथी वन डे उद्या जोहान्सबर्गच्या मैदानात खेळवण्यात येत आहे.


ही वन डे जिंकून सहा वन डे सामन्यांच्या मालिकेत 4-0 अशी विजयी आघाडी घेण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न राहिल. भारताने 1992-93 सालच्या पहिल्या दौऱ्यानंतर दक्षिण आफ्रिकेत वन डे सामन्यांची मालिका कधीही जिंकलेली नाही. पण विराट कोहलीच्या टीम इंडियाला आता 25 वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेत वन डे सामन्यांची मालिका जिंकण्याची संधी आहे.

विशेष म्हणजे सलग चौथी वन डे जिंकली, तर आयसीसीच्या क्रमवारीत भारतीय संघाला नंबर वनवर विराजमान होता येईल. दक्षिण आफ्रिकेच्या दृष्टीने जमेची बाजू म्हणजे दुखापतीतून सावरलेला एबी डिव्हिलियर्स या सामन्यात पुनरागमन करणार आहे.

डिव्हिलियर्सला कसं रोखणार?

दक्षिण आफ्रिकेचा संघ मैदानात गुलाबी जर्सीत उतरणार आहे. याच जर्सीत तीन वर्षांपूर्वी डिव्हिलियर्सने वन डेतील सर्वात वेगवान शतक ठोकलं होतं. गुलाबी जर्सीत दक्षिण आफ्रिकेने आतापर्यंत खेळलेल्या सर्व सामन्यात विजय मिळवला आहे. 2011 साली पहिल्यांदाच ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेससाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ गुलाबी जर्सीत मैदानात उतरला होता.

भारताविरुद्ध नेहमीच चांगली कामगिरी करणाऱ्या डिव्हिलियर्सला रोखण्याचं आव्हान यावेळी भारतासमोर असेल. भारताविरुद्धच्या 29 वन डे सामन्यांमध्ये त्याने आतापर्यंत एकूण 1295 धावा केल्या आहेत. यामध्ये 6 शतकं आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे. भारताविरुद्धच्या गेल्या तीन वन डे सामन्यांमध्ये त्याचे दोन शतकं आहेत.

डिव्हिलियर्सला रोखण्याची जबाबदारी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमरा यांच्यावर असेल. कारण, डिव्हिलियर्स फिरकीपटूंविरुद्ध नेहमीच चांगला खेळतो. रिव्हर्स स्वीप ही त्याची ताकद आहे. कसोटी मालिकेत बुमराने डिव्हिलियर्सला तीन वेळा बाद केलं आहे. तर भुवनेश्वर कुमारने गेल्या तीन वन डे सामन्यात डिव्हिलियर्सला दोन वेळा माघारी धाडलं आहे.