सेंच्युरियन : विराट कोहलीच्या टीम इंडियाला केपटाऊन कसोटीपाठोपाठ सेन्च्युरियन कसोटीतही लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.
या कसोटीत दक्षिण आफ्रिकेनं भारताचा 135 धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली.
या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाला विजयासाठी 287 धावांचं आव्हान दिलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाची चौथ्या दिवसअखेर तीन बाद 35 अशी केविलवाणी अवस्था झाली होती. भारतीय संघाचा अख्खा डाव आज 151 धावांत आटोपला.
चौथ्या दिवशी सलामीच्या मुरली विजय आणि लोकेश राहुल यांच्यापाठोपाठ विराट कोहलीही माघारी परतला.
कोहली बाद झाल्यावर कैफ म्हणाला, इट्स ऑल ओव्हर, वीरुला लगानची आठवण
परंतु पाचव्या दिवसाच्या सुरुवातीलाच चेतेश्वर पुजारा 19 धावांवर धावचीत झाला. त्यावेळी भारताच्या 50 धावाही पूर्ण झाल्या नव्हत्या. त्यानंतर रबाडाने पार्थिव पटेलला बाद केलं. पटेललाही 19 धावाच करता आल्या.
मग त्यानंतर हार्दिक पंड्या 6 आणि अश्विन 3 धावा करुन माघारी परतले. त्यानंतर रोहित शर्माने मोहम्मद शमीच्या साथीने फटकेबाजी केली. मात्र रबाडाने त्याला 46 धावांवर तर एनगिडीनं शमीला 28 धावांवर बाद केलं.
दक्षिण आफ्रिकेतर्फे एनगिडीनं 39 धावांत सहा, तर रबादानं 47 धावांत तीन फलंदाजांना माघारी धाडलं. त्यामुळे केपटाऊनपाठोपाठ सेन्च्युरियन कसोटीतही भारतीय संघावर पराभवाची नामुष्की ओढावली.
दुसऱ्या डावात टीम इंडियाची घसरगुंडी, विजयासाठी २८७ धावांचं आव्हान
आफ्रिकेचं 287 धावांचं आव्हान
दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 335 धावा केल्या होत्या. त्यानंतर कर्णधार विराट कोहलीच्या दीडशतकाच्या जोरावर भारताचा पहिला डाव 307 धावांवर आटोपला. त्यामुळे आफ्रिकेकडे 28 धावांची आघाडी होती. मग दुसऱ्या डावात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा डाव 258 धावांमध्ये गुंडाळला. त्यामुळे आफ्रिकेच्या पहिल्या डावातील 28 धावांची आघाडी आणि दुसऱ्या डावातील 258 धावा मिळून, भारतासमोर 287 धावांचं आव्हान होतं.
पंचांशी हुज्जत महागात, विराटवर दंडाची कारवाई
विराटचं शतक
त्याआधी, विराट कोहलीने झळकावलेल्या मॅरेथॉन शतकाने टीम इंडियाला सर्व बाद 307 धावांची मजल मारुन दिली. विराटचं कसोटी कारकीर्दीतलं हे एकविसावं शतक ठरलं. त्याने 217 चेंडूंमधली 152 धावांची खेळी 15 चौकारांनी सजवली. विराटने हार्दिक पंड्याच्या साथीने सहाव्या विकेटसाठी 45 धावांची आणि रवीचंद्रन अश्विनच्या साथीने सातव्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी रचली.
कसोटी संक्षिप्त धावफलक
दक्षिण आफ्रिका पहिला डाव - सर्वबाद 335
भारत पहिला डाव - सर्वबाद 307
दक्षिण आफ्रिका दुसरा डाव - सर्वबाद 258
भारत दुसरा डाव - सर्वबाद 151