दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यानंतर पावसाचा जोर काहीसा ओसरला. मात्र सामना सुरू होण्यापूर्वी पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली. परिणामी पंचानी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
धर्मशाला येथे गेल्या दोन दिवसांपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. रविवारी दिवसभर पावसाने हजेरी लावल्यामुळे मैदानावर पाणी साचले होते. परिणामी पंचानी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. बीसीसीआयने ट्वीट करत ही माहिती दिली आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या तीन टी-20 सामन्याची मालिका होणार आहे. धर्मशाला येथे होणारा पहिला सामना पावसाने पाण्यात गेला आहे. दुसरा सामना चंदीगड येथे खेळवला जाणार आहे. आगामी ट्वेन्टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या दृष्टीने कर्णधार विराट कोहली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेन्टी-20 सामन्यांच्या मालिकेकडे पाहात आहे. भारताने वेस्ट इंडिजमधील ट्वेन्टी-20 मालिकेत 3-0 असे यश मिळवले होते. त्यामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास वाढलेला आहे.