मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आता साताऱ्यात पोहोचली आहे. मात्र या यात्रेतील बसला अडथळा येऊ नये म्हणून साताऱ्यात रस्त्याच्या कडेच्या झाडांची कत्तल सुरु असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. याआधीही बुलडाण्यात यात्रेदरम्यान वीजपुरवठा खंडित केल्याचा प्रकार समोर आला होता. दरम्यान आज साताऱ्यात महाजनादेश यात्रेच्या आधी सांगली मिरज रस्त्यावर झाडांच्या कत्तली सुरु असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या यात्रेतील बसला अडथळा नको म्हणून सगळे नियम धाब्यावर बसवत खुलेआम सांगली मिरज रोडवर झाडांच्या कत्तली सुरु आहेत. सामान्य नागरिकाने जर झाड तोडले तर गुन्हा आहे. मग याच नियमाप्रमाणे मुख्यमंत्र्यांवर देखील गुन्हा दाखल व्हायला हवा, अशी मागणी जयंत पाटील यांनी ट्विटरवर केली आहे.



सोबतच एकीकडे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार 33 कोटी वृक्ष लावण्याचे काम केले आहे असे सांगतात, मात्र दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी 33 कोटी वृक्ष तोडण्याचे ध्येय समोर ठेवले आहे असे दिसते, असा आरोपही पाटील यांनी केला आहे.


या प्रकारावर खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील टीका केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा काल बारामती आली होती यादरम्यान काही कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीमार केला गेला. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मुख्यमंत्र्यांची ही यात्रा म्हणजे सर्वसामान्य माणसांना त्रास असून या यात्रेच्या वेळी वीज कनेक्शन तसेच झाडांच्या फांद्या तोडणे असे दुर्दैवी प्रकार होत आहेत. मुख्यमंत्र्यांची ही दडपशाही असून ही कुठेतरी थांबायला हवी अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.