मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला तिसरा ट्वेन्टी ट्वेन्टी सामना आज थिरुवनंतरपुरम येथे खेळवण्यात येईल. न्यूझीलंडने दुसरा ट्वेन्टी ट्वेन्टी सामना जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. त्यामुळे उभय संघांमधला तिसरा ट्वेन्टी ट्वेन्टी सामना हा मालिकेच्या दृष्टीने निर्णायक ठरला आहे. साहजिकच दोन्ही संघ हा सामना जिंकण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरतील.
संथ फलंदाजीने धोनी पुन्हा निशाण्यावर
ग्लेन फिलिप्सचा धोनीला यष्टिचीत करण्याचा राजकोटमधील सामन्यातील प्रयत्न भारताच्या माजी कर्णधाराच्या शारीरिक लवचिकतेनेच असफल ठरवला. वयाच्या 36 व्या वर्षीही धोनीने आपले दोन्ही पाय इतके स्ट्रेच करू शकतो, यात खरोखरच त्याचं कौतुक आहे. पण तोच धोनी राजकोटच्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात त्याच्या लौकिकाला साजेशी मॅचफिनिशरची भूमिका बजावू शकला नाही. त्यामुळे धोनी आपली कारकीर्द स्ट्रेच करतो आहे का, असा प्रश्न पुन्हा विचारण्यात येऊ लागला आहे.
लक्ष्मण, आगरकरकडून धोनीच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह
व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण आणि अजित आगरकर यांनी तर धोनीच्या भारतीय संघातल्या स्थानाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. आगरकर म्हणतो, की बीसीसीआयच्या निवड समितीने किमान ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांसाठी तरी धोनीचा पर्याय शोधायला हवा. वन डे सामन्यांमध्ये धोनीच्या भूमिकेबाबत निवड समिती समाधानी दिसत आहे. पण ट्वेन्टी ट्वेन्टीचं तसं नाही. धोनीला ट्वेन्टी ट्वेन्टीतून वगळलं तर मला नाही वाटत टीम इंडियाला एक फलंदाज म्हणून त्याची उणीव भासेल.
व्हीव्हीएस लक्ष्मण म्हणाला की, धोनीला ट्वेन्टी ट्वेन्टीत मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना अधिक मेहनत करावी लागणार आहे. राजकोटच्या ट्वेन्टी ट्वेन्टीत त्याला करावा लागलेला संघर्ष स्पष्ट दिसला. निवड समितीने आता धोनीऐवजी तरुण पर्यायांचा विचार करायला हरकत नाही.
धोनीला चौथ्या क्रमांकावर बढती मिळणार?
धोनीचं ट्वेन्टी ट्वेन्टीतलं स्थान लक्ष्मणने अगदीच मोडीत काढलं नाही. धोनीला चौथ्या क्रमांकावर खेळवलं, तर त्याला ट्वेन्टी ट्वेन्टीत अजूनही संधी असल्याचं मत लक्ष्मणने बोलून दाखवलं. धोनी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला , तर त्याला मैदानात पाय रोवण्यासाठी नक्कीच वेळ मिळू शकतो. पण विश्वचषक संघबांधणीच्या नावाखाली वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टीत भारतीय संघव्यवस्थापन सातत्याने प्रयोग करताना दिसत आहे. त्यामुळे धोनीला त्याचा हक्काचा चौथा क्रमांक मिळू शकत नाही.
राजकोटच्या सामन्यात टीम इंडियाने श्रेयस अय्यरला तिसऱ्या क्रमांकावर बढती दिली. त्यामुळे विराट कोहली चौथ्या क्रमांकावर आला. मग धावगती उंचावण्यासाठी हार्दिक पंड्याला पाचव्या क्रमांकावर पाठवण्यात आलं. धोनी सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला, त्या वेळी भारताच्या डावातलं दहावं षटकं सुरू झालं होतं.
धोनीने विराट कोहलीच्या साथीने 44 चेंडूंत 56 धावांची भागीदारी रचून भारतीय डाव सावरला. धोनीने 37 चेंडूंत दोन चौकार आणि तीन षटकारांसह 49 धावांची खेळीही उभारली. पण विजयासाठी वीस षटकांत 197 धावांचं आव्हान समोर असताना धोनी-विराटची भागीदारी आणि धोनीची खेळीही तुलनेत संथ भासली. धोनीच्या दोन चौकार आणि तीन षटकारांचा अपवाद वगळला, तर त्याने उर्वरित 32 चेंडूंत मिळून केवळ 23 धावांचीच वसुली केली.
राजकोटमधल्या या अनुभवातून शहाणं होऊन भारतीय संघव्यवस्थापन धोनीला चौथ्या क्रमांकावर बढती देण्याची चिन्हं आहेत.
राजकोटच्या मैदानात न्यूझीलंडचा नाबाद शतकवीर कॉलिन मन्रोला भारतीय क्षेत्ररक्षकांनी दिलेली चार जीवदानंही दुसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टीत निर्णायक ठरली. त्यामुळं धोनीच्या फलंदाजीची सोय लावताना कर्णधार विराट कोहलीला आपल्या ढिसाळ क्षेत्ररक्षकांचे कान पिळावे लागणार आहेत. तरच टीम इंडियाला तिसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात विजयाची अपेक्षा करता येईल.
तिसऱ्या टी-20 सामन्यात धोनीला चौथ्या क्रमांकावर बढती मिळणार?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Nov 2017 07:44 AM (IST)
उभय संघांमधला तिसरा ट्वेन्टी ट्वेन्टी सामना हा मालिकेच्या दृष्टीने निर्णायक ठरला आहे. साहजिकच दोन्ही संघ हा सामना जिंकण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरतील.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -