गांधीनगर: गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेस ‘मनमोहनास्त्र’ वापरणार आहे. काँग्रेसने गुजरातच्या प्रचारात माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.


काँग्रेस नोटाबंदी आणि जीएसटीवर लक्ष केंद्रीत करुन भाजपविरोधात प्रचार करणार आहे. उद्या  म्हणजेच 8 नोव्हेंबरला नोटबंदीला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आता गुजरातमध्ये स्वत: मनमोहन सिंह यांना प्रचाराच्या मैदानात उतरवण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.

मनमोहन सिंग आज एकच दिवस गुजरातमध्ये प्रचार करणार आहेत. यादरम्यान ते जीएसटी आणि नोटाबंदीतील त्रुटी जनतेसमोर मांडतील. या प्रचारसभेनंतर मनमोहन सिंह अहमदाबादेतील काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेणार आहेत.

किचकट जीएसटी सुधारु

आम्ही सत्तेत आल्यावर 2019 मध्ये किचकट जीएसटी काढून टाकू असा निर्णय काँग्रेस कमिटीनं घेतला आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सध्या पाच प्रकारचा जीएसटी भाजप सरकारनं लावलाय. तो हटवून 15 ते 18 टक्क्यांमधील एकच कर जीएसटी प्रणाली लागू करणार असल्याचं निरुपम यांनी म्हटलं आहे.  त्यामुळं सर्वसामान्य आणि व्यापाऱ्यांचा फायदा होईल असा दावा त्यांनी केलाय.