IND vs NZ 1st Test Kanpur : कानपूरमध्ये सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघानं (Indian Cricket Team) पहिल्या दिवशी चांगली सुरुवात केली आहे. दिवसाखेर भारताने दिलासादायक सुरुवात करत 4 विकेट्सच्या बदल्यात 258 धावा केल्या आहेत. शुभमन, श्रेयस आणि जाडेजा यांच्या अर्धशतकांमुळे भारत सुस्थितीत आहे. आज दुसऱ्या दिवशी भारतीय संघ मोठी धावसंख्या उभारण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. शिवाय आज श्रेयस अय्यरकडे नवा इतिहास रचण्याची संधी आहे. पदार्पणाच्या कसोटी सामन्यात शतक झळकावण्याची संधी त्याच्याकडे आहे.
श्रेयसचा पदार्पणातच धमाका
श्रेय्यस अय्यरनं 2017 मध्ये भारताकडून एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानं श्रीलंकाविरुद्ध धर्मशाला येथे पहिला एकदिवसीय सामना खेळला होता. श्रेयस अय्यरनं काल कसोटीमध्ये पदार्पण केलं. पहिल्या सामन्यातच त्याने अर्धशतक झळकावलं असून सध्या तो 136 चेंडूत 75 धावांवर खेळत आहे. त्याच्याकडे पदार्पणाच्या कसोटीत शतक करत इतिहास रचण्याची संधी आहे. याआधी भारताकडून 14 खेळाडूंनी पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावण्याची किमया साधली आहे.
या भारतीयांनी ठोकलंय पदार्पणाच्या कसोटीत शतक
लाला अमरनाथ, दीपक शोधन, एजी कृपाल सिंह, अब्बास अली बैग, हनुमंत सिंह, गुंडाप्पा विश्वनाथ, सुरिंदर अमरनाथ, मोहम्मद अझरुद्दीन, प्रवीण आमरे, सौरव गांगुली, विरेंद्र सहवाग, सुरेश रैना, शिखर धवन, रोहित शर्मा या खेळाडूंनी आपल्या पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे.
कानपूर कसोटीत भारताची चांगली सुरुवात
सामन्याची सुरुवात सलामीवीर शुभमनने उत्तम करुन दिली. अगरवाल (13) आणि पुजारा (26) यांनी त्याला काहीशी साथ दिली. तर पण शुभमनने अर्धशतक (52) झळकावल्यानंतर तोही तंबूत परतला. कर्णधार रहाणेही 35 धावा करुन बाद झाला. आता अय्यर नाबाद 75 आणि जाडेजा नाबाद 50 धावांवर खेळत आहेत.