लंडन: इंग्लंडच्या झुंजार फलंदाजीनं नॉटिंगहॅम कसोटीत टीम इंडियाला विजयासाठी पाचव्या दिवसाची प्रतीक्षा करायला भाग पाडलं आहे. या कसोटीत जसप्रीत बुमरानं दुसऱ्या नव्या चेंडूवर इंग्लंडची पुन्हा दाणादाण उडवून, टीम इंडियाला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलं होतं. पण तळाच्या तीन फलंदाजांनी केलेल्या संघर्षानं इंग्लंडला चौथ्या दिवसअखेर नऊ बाद 311 धावांची मजल मारुन दिली. त्यामुळे भारताला विजयासाठी पाचव्या दिवसाची प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय राहिला नाही.

ही कसोटी जिंकण्यासाठी भारताला केवळ एकच विकेट हवी असून,  521 धावांचं डोंगराएवढं आव्हान असलेली इंग्लंड अजून 210 धावांनी पिछाडीवर आहे.

नॉटिंगहॅम कसोटीत चौथ्या दिवशी उपाहाराला इंग्लंडची चार बाद 84 अशी केविलवाणी अवस्था झाली होती. पण शतकवीर बटलर आणि स्टोक्सनं पाचव्या विकेटसाठी 169 धावांची भागीदारी रचून भारताचा विजय लांबवला. बटलरआणि स्टोक्सने भारतीय गोलंदाजांना चांगलंच झुंजवलं. पहिल्या चार विकेट झटपट गेली असताना, पाचव्या विकेटसाठी भारतीय गोलंदाजांना मोठा संघर्ष करावा लागला. बटलरने 106 तर बेन स्टोक्सने 62 धावा केल्या. अखेर बुमराने बटलरला पायचीत करुन, ढेपाळलेल्या भारतीय खेळाडूंमध्ये चैतन्य आणलं.

त्यानंतर मग दुखापतग्रस्त जॉनी बेयरस्टोला शून्यावर माघारी धाडत, बुमरानेच भारताला सहावी विकेट मिळवून दिली. 83 व्या षटकात बुमराहने या दोन्ही फलंदाजांना माघारी धाडलं.

त्यानतंर मग 85 व्या षटकात बुमराने ख्रिस वोक्सला ऋषभ पंतच्या हाती झेल देण्यास भाग पाडलं. वोक्स केवळ 4 धावा करुन माघारी परतला. मग रशिद आणि ब्रॉड या जोडीनं नवव्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी रचून भारताचा विजयाचा मार्ग अडवून धरला.  त्यासाठी भारतीय गोलंदाजांना आज पुन्हा मैदानात उतरावं लागणार आहे.

जसप्रीत बुमराने भेदक मारा करत, सर्वाधिक पाच फलंदाजांना माघारी धाडलं. ईशांत शर्मानं दोन, शमी आणि पंड्यानं प्रत्येकी एक विकेट घेतली. त्यामुळं चौथ्या दिवसअखेर इंग्लंड संघ नऊ बाद 311 अशा पराभवाच्या उंबरठ्यावर होता. जेम्स अँडरसन 8 आणि अदिल रशिद 30 धावांवर खेळत आहेत.

भारतीय गोलंदाज आज ही जोडी फोडून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब करतील.