मुंबई : भारत आणि इंग्लंडमधल्या कसोटी मालिकेच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही फौजा आमनेसामने येणार आहेत. या दोन्ही संघातल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतली पहिली लढाई बर्मिंगहमच्या एजबेस्टन मैदानावर खेळवण्यात येईल. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिली कसोटी एक ऑगस्ट (बुधवार) पासून सुरु होणार आहे. गेल्या अकरा वर्षात भारताला इंग्लिश भूमीवर एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. त्यामुळेच विराटची टीम इंडिया इंग्लिश भूमीवर मालिका विजयासाठी सज्ज झाली आहे.


2014 नंतर भारतीय संघ पहिल्यांदाच इंग्लंड दौऱ्यात कसोटी मालिका खेळणार आहे. या दौऱ्यातल्या ट्वेन्टी ट्वेन्टी मालिकेत टीम इंडियानं 2-1 अशी बाजी मारली होती. तर वन डेत इंग्लंड संघाची 2-1 अशी सरशी झाली होती. त्यामुळे कसोटी मालिकेच्या निमित्तानं आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी या दोन्ही फौजा आता सज्ज झाल्या आहेत.

आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत टीम इंडिया पहिल्या स्थानावर आहे. तर इंग्लंड पाचव्या स्थानावर. पण इंग्लंडची मायदेशातली कामगिरी भारताच्या तुलनेत नेहमच वरचढ राहिलीये. त्यामुळे या दोन्ही संघांमधली पाच कसोटी सामन्यांची मालिका तितक्याच तुंबळपणे लढली जाईल.

जेम्स अँडरसन विरुद्ध विराट कोहली

स्विंगचा बादशाह जेम्स अँडरसन आणि रन मशिन विराट कोहली यांच्यातलं द्वंद्व हे भारत आणि इंग्लंडमधल्या कसोटी मालिकेचं प्रमुख वैशिष्ट्य ठरावं. अँडरसननं आजवर कसोटीत पाच वेळा विराटला तंबूचा रस्ता दाखवलाय. त्यात 2014 च्या इंग्लंड दौऱ्यात त्यानं चार वेळा विराटला बाद केलं होतं. त्यामुळे अँडरसनचा सामना करण्यासाठी विराट यावेळी कशी रणनिती आखतोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

विराटची परदेशातील कामगिरी

2014 चा इंग्लंड दौरा विराटसाठी निराशाजनक ठरला होता. त्या दौऱ्यात विराटला पाच कसोटीत 13.50 च्या सरासरीनं अवघ्या 134 धावाच करता आल्या होत्या. पण त्यानंतर गेल्या चार वर्षात विराटनं भारताबाहेर सातत्यानं धावांचा रतीब घातलाय. विराटच्या परदेशातल्या कामगिरीवर नजर टाकल्यास त्यानं 34 कसोटीत 45.40 च्या सरासरनं 2633 धावा फटकावल्या आहेत. त्यात 11 शतकं आणि सहा अर्धशतकांचा समावेश आहे. मार्च महिन्यातल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही विराटनं 47.66 च्या सरासरीनं सर्वाधिक 286 धावा फटकावल्या होत्या. विराटचा सध्याचा फॉर्म लक्षात घेता इंग्लंडमध्येही कर्णधार आणि फलंदाज या नात्यानं त्यांच्याकडून भरीव कामगिरीची अपेक्षा राहील.

टीम इंडियासमोरील आव्हान

इंग्लंडच्या वेगवान आणि उसळत्या खेळपट्ट्यांवर इंग्लिश आक्रमणाचा सामना करणं हे टीम इंडियासमोरची मोठी कसोटी असेल. अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड, बेन स्टोक्स या वेगवान आक्रमणाला थोपवण्यासाठी भारताच्या ताफ्यात कर्णधार कोहलीसह शिखर धवन, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, लोकेश राहुल, अजिंक्य रहाणे  आणि दिनेश कार्तिक अशी फलंदाजांची फळी सज्ज आहे. दुखापतीमुळे संघाबाहेर असलेल्या भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराची जागा भरुन काढण्यासाठी इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव आणि अष्टपैलू हार्दिक पंड्याचा संघात समावेश करण्यात आला आहे.

इंग्लंडमधील भारताची कामगिरी

इंग्लंडमध्ये भारताची आजवरची कामगिरी पाहता यजमान संघाचं पारडं जड असल्याचं दिसून येतंय. उभय संघांमध्ये आजवर खेळवण्यात आलेल्या 17 कसोटी मालिकांपैकी 13 मालिका इंग्लंडनं जिंकल्या आहेत. तर केवळ 3 मालिकांमध्ये भारताला यश मिळालं आहे. त्यात गेल्या अकरा वर्षात भारताला इंग्लिश भूमीवर एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. 2007 साली राहुल द्रविडच्या नेतृत्वात भारतानं शेवटची मालिका जिंकली होती. त्यानंतर 2011 आणि 2014 साली भारताला 4-0 आणि 3-1 असा सपाटून मार खावा लागला होता.

त्यामुळे भारतीय क्रिकेटचाहत्यांना आताच्या इंग्लंड दौऱ्यात टीम इंडियाकडून चांगल्या कामगिरची किंबहुना चौथ्या मालिकाविजयाची अपेक्षा राहील. विराट आणि शिलेदारांनी तशी किमया करुन दाखवली तर तो एक नवा इतिहास ठरावा.

संबंधित बातम्या

भारताची इंग्लंडविरुद्ध ‘कसोटी’, इतिहास काय सांगतो?  

विराटला कसोटीत अव्वल स्थानी झेप घेण्याची संधी  

भारत कसोटी मालिका जिंकणार नाही, दोन भारतीय खेळाडूंची भविष्यवाणी