IND vs ENG, India T20 Squad निर्धारित षटकांच्या क्रिकेट सामन्यांमध्ये ऋषभ पंतला भारतीय संघाकडून पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. बीसीसीआयनं नुकतंच इंग्लंडच्या संघासोबतच्या आगामी टी20 मालिकेसाठी संघ जाहीर केला. संघात नेमका कोणकोणत्या खेळाडूंचा समावेश असेल याचा उलगडा बीसीसायकडून ट्विटरच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
IPL मध्ये मुंबईच्या संघातून दमदार कामगिरी करणाऱ्या सूर्यकुमार यादव, ईशान किशन या खेळाडूंनाही संघात स्थान देण्य़ात आलं आहे. आयपीएल 2020 आणि स्थानिक क्रिकेटमधील प्रशंसनीय कामगिरीसाठी या खेळाडूंना ही संधी देण्यात आली आहे.
तिथं, ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या निर्धारित षटकांच्या सामन्यातून ऋषभ पंतला वगळण्यात आलं असलं तरीही आता मात्र कसोटी सामन्यातील सातत्यपूर्ण कामगिरीमुळं त्याला इंग्लंडविरोधात खेळवल्या जाणाऱ्या टी20 सामन्यांसाठी संघात स्थान देण्यात आलं आहे.
मोठा खुलासा! यशशिखरावर असणारा विराट एकटा पडतो तेव्हा....
ईशान किशनसाठी संघात स्थान मिळण्याचा हा दिवस अधिकच खास आहे. कारण, मध्य प्रदेशविरोधात खेळल्या गेलेल्या विजय हजारे सामन्यात तिथं त्यानं झारखंडच्या संघाकडून खेळताना 94 चेंडूंमध्ये 173 धावांचा डोंगर रचला, तर इथं त्याची भारतीय टी20 संघात वर्णी लागली. संजू सॅमसनला मात्र संघात स्थान मिळालेलं नाही.
मागील वर्षीच्या IPL मध्ये राजस्थानच्या संघाकडून दमदार कामगिरी करणाऱ्या राहुल तेवतिया यालाही संघात सुवर्णसंधी देण्यात आली आहे. संघात समाविष्ट करण्यात आलेल्या या नव्या जोमाच्या खेळाडूंची कामगिरी येत्या काळात क्रीडा रसिकांसाठी कुतूहलाचा आणि उत्सुकतेचा विषय ठरणार आहे.