मुंबई: भारत आणि इंग्लंडच्या संघांमधल्या तीन ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेला उद्यापासून सुरुवात होत आहे. या मालिकेची पहिली लढाई कानपूरच्या ग्रीनपार्कवर खेळवण्यात येणार आहे. दुपारी साडेचार वाजता या सामन्याची सुरुवात होईल.
टीम इंडियानं विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली खेळताना कसोटी मालिकेत इंग्लंडवर 4-0 अशी मात केली होती. मग वन डे मालिकेतही भारतानं 2-1 असा विजय साजरा केला. त्या मालिकेतली कोलकात्याची अखेरची लढाई जिंकून इंग्लंडनं आपण मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताला तोडीस तोड कामगिरी बजावू शकतो हे दाखवून दिलं. त्यामुळं दोन्ही संघांमधल्या ट्वेन्टी ट्वेन्टी मालिकेतली चुरस आणखी वाढली आहे.
ट्वेन्टी ट्वेन्टी मालिका ही टीम इंडियाच्या दुसऱ्या फळीसाठी आणि युवा शिलेदारांसाठी आपलं कसब दाखवून देण्याची नामी संधी ठरू शकते. रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजाला या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्याऐवजी अमित मिश्रा आणि परवेझ रसूलचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.
अंडर नाईन्टीन विश्वचषक गाजवणारा दिल्लीचा युवा फलंदाज ऋषभ पंत रणजी मोसमातल्या दमदार कामगिरीनंतर इंग्लंडविरुद्ध ट्वेन्टी ट्वेन्टी मालिकेचं आव्हान पेलण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याशिवाय मनदीप सिंग, यजुवेन्द्र चहल, सुरेश रैना आणि आशिष नेहरा हे चार ताज्या दमाचे शिलेदार ट्वेन्टी ट्वेन्टी मालिकेत खेळायला उतरणार आहेत.