मुंबई : देशातील प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या 'भाभा रिसर्च सेंटर'मध्ये सायंटिस्ट ऑफिसर या पदावर काम तरुणी बेपत्ता झाली आहे. 23 वर्षीय बबिता सिंह बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मूळ उत्तर प्रदेशची असलेली बबिता पाच वर्षांपासून मुंबईत राहते.


बबिता 23 जानेवारीपासून बेपत्ता असून पोलिस तिचा शोध घेत आहेत. मात्र बेपत्ता होण्यापूर्वी बबितानं तिच्या भावाला एक ईमेल पाठवला होता. भाभा संस्थेत वरिष्ठांकडून आपला छळ होत असून त्याला कंटाळून मी निघून जात आहे, असं तिनं नमूद केलं आहे.

'मी बीएआरसीला जॉईन झाले त्या दिवसापासून मला त्रास दिला जात आहे. माझ्यावर ओरडलं जातं. वरिष्ठांशी बोलण्याचीही मला भीती वाटते. माझ्याशी अत्यंत वाईट पद्धतीने बोललं जातं. माझ्या खाजगी आयुष्यावरुन शेरेबाजी केली जाते. माझे कुटुंबीय आणि मित्रमंडळींची मी माफी मागते. त्यांना कोणतंही उत्तर न देता, मी सोडून जात आहे. मला माफ करा. रोज रोज मरण्यापेक्षा एकदाच मेलेलं बरं' असं बबिताने मेलमध्ये म्हटलं आहे.

सीसीटीव्ही पाहिल्यावर 23 जानेवारीला दुपारी 1 वाजून 4 मिनिटांनंतर बबिता दिसलेली नाही. बबिताने तिचा मोबाईल खोलीत लॉक करुन चावी वॉर्डनकडे दिली होती. बबिताच्या ईमेलमुळे तिच्या घरचे तर चिंतेत सापडले आहेतच, मात्र भाभा अॅटोमिक रिसर्चसारख्या जागतिक दर्जाच्या संस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.