युतीची बोलणी होणार, उद्धव आणि फडणवीसांची मध्यस्थाद्वारे चर्चा
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद | 25 Jan 2017 07:14 PM (IST)
औरंगाबाद : एकीकडे शिवसेना आणि भाजपनं स्वबळावर लढण्याची तयारी केली असली तरी आता एका मध्यस्थाद्वारे दोन्ही पक्षांमध्ये चर्चा होण्याची चिन्हं आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात एका मध्यस्थाद्वारे चर्चा होणार असल्याची माहिती 'एबीपी माझा'च्या सूत्रांनी दिली आहे. मुंबई महापालिकेत शिवसेना आणि भाजपने युती करण्याबाबतची बोलणी तूर्तास रखडली आहे. त्यामुळे या थांबलेल्या चर्चेला गती देण्याचा प्रयत्न मध्यस्थाद्वारे होणार आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यात दुवा साधणारा मध्यस्थ कोण, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. फोन कोण करणार, या मुद्द्यावरुन युतीचं गाडं अडल्याचं म्हटलं जातं. मात्र बुधवारी रात्रीपर्यंत उद्धव आणि फडणवीस यांची पुन्हा फोनवरुन चर्चा होण्याची शक्यता आहे. या चर्चेवरच युतीची पुढील दिशा ठरणार आहे. त्यामुळे सर्वांचं लक्ष या चर्चेकडे लागलं आहे. मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीत झालेल्या बैठकीत फडणवीसांनी पक्षाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली नसल्याचंही म्हटलं जातं. विशेष म्हणजे युती तुटल्यास त्याची घोषणा आपल्याकडून व्हायला नको, असे आदेश भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांना दिल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.