INDvsENG : भारत विरुद्ध इंग्लंडदरम्यान सुरु असलेल्या टी 20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यात इंग्लंडनं टीम इंडियाला सहज नमवत पुन्हा मालिकेत आघाडी घेतली आहे. भारतावर 8 विकेट्सने मात करत इंग्लंडने हा विजय साजरा केला. कर्णधार विराट कोहलीच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडला 157 धावांचं आव्हान दिलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर जोस बटलरने नाबाद 83 धावांची खेळी करत भारतीय गोलंदाजाची धुलाई केली. त्याला बेअरस्टोने नाबाद 40 धावा करत चांगली साथ दिली. या विजयामुळे इंग्लंडने टी-20 मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे.
157 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडची सुरुवात चांगली झाली नाही. जेसन रॉयला 9 धावांवर युजवेंद्र चहलने बाद केले. त्यानंतर डेव्हिड मलान 18 धावांवर बाद झाला. मात्र यानंतर बटलर आणि बेअरस्टोनं कुठलीही पडझड न होऊ देता संघाला विजय मिळवून दिला. बटलरने 52 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 83 धावा केल्या तर बेअरस्टोने 28 चेंडूत 5 चौकारांसह नाबाद 40 धावा केल्या.
त्याआधी टॉस जिंकून इंग्लंडने टीम इंडियाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. भारताने 20 षटकात 6 गड्यांच्या मोबदल्यात 156 धावा उभारल्या. पहिल्या सामन्यासारखंच या सामन्यातही टीम इंडियाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. लोकेश राहुल शून्यावर बाद झाला तर दोन सामन्यांच्या विश्रातीनंतर आलेल्या रोहित शर्मालाही मोठी खेळी करता आली नाही. इशान किशनही चार धावांवर बाद झाला. ऋषभ पंत 25 धावांवर धावबाद झाला. एकीकडे संघाची अवस्था बिकट असताना कर्णधार विराटने 46 चेंडूत 8 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 77 धावा करत संघाला चांगली धावसंख्या उभारुन दिली.
इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गनचा खास विक्रमभारताविरुद्धच्या इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गनने खास विक्रमाची नोंद केली आहे. मॉर्गन इंग्लंडसाठी 100 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळणारा पहिलाच क्रिकेटपटू ठरला. 2009 मध्ये म्हणजेच 12 वर्षांपूर्वी मॉर्गनने नेदरलँड्सविरुद्ध टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मॉर्गन 100 किंवा अधिक टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा जगातील चौथा खेळाडू ठरला. या विक्रमात प्रथम क्रमांकावर बांगलादेशचा शाकिब अल हसन, दुसर्या क्रमांकावर भारताचा रोहित शर्मा तर, तिसर्या क्रमांकावर न्यूझीलंडचा रॉस टेलर आहे.