लखनौ : फक्त 230 धावांचे आव्हान असूनही टीम इंडियाच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे इंग्लंडचा तब्बल 100 धावांनी धुव्वा उडवला. जसप्रित बुमराहने सलग दोन चेंडूवर इंग्लंडला हादरे दिल्यानंतर इंग्लंडचा डाव शेवटपर्यंत सावरलाच नाही. मोहम्मद शमीने सलग दुसऱ्या सामन्यात घातक मारा करत चार विकेट घेतल्या आणि इंग्रजांचा बाजार उठवण्यात मोलाची भूमिका बजावली. छोट्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंड संघाला जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड मलान यांनी चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 30 धावा जोडल्या, पण त्यानंतर जे घडलं ते इंग्लंडसाठी आश्चर्यचकित करणारे होते. डेव्हिड मलान (16) आणि जो रूट (0) यांना बुमराहने लागोपाठ दोन चेंडूत बाद केले, तर शमीने बेन स्टोक्स (0) आणि जॉनी बेअरस्टो (14) यांना बाद करून ब्रिटीशांची अवस्था बिघडवली. कर्णधार जोस बटलर 10 धावांवर कुलदीप यादवचा बळी ठरला तेव्हा इंग्लंडच्या सर्व उत्साहावर विरजण पडले.






शमी आणि बुमराहच्या भेदक गोलंदाजीला कुलदीप आणि रविंद्र जडेजाची सुद्धा दमदार साथ मिळाली. शमीने चारपैकी तीन क्लीनबोल्ड विकेट घेत इंग्लंडची दाणादाण उडवली. बुमराहने तीन विकेट घेतल्या. इंग्लंडच्या दहापैकी पाच फलंदाजांच्या शमी आणि बुमराहने दांड्या गुल करत इंग्रजांना जागा दाखवून दिली. 






लखनौच्या संथ खेळपट्टीवर प्रथम खेळून भारतीय संघाने केवळ 229 धावा केल्या होत्या. इंग्लंड संघ हे लक्ष्य सहज गाठेल असे वाटत होते. पण मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांच्या घातक गोलंदाजीपुढे इंग्लंडचा संघ गारद झाला आणि संपूर्ण संघ केवळ 129 धावांवर गारद झाला.






या विश्वचषकात भारताचा हा सलग सहावा विजय आहे. यासह पाँईंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर पोहोचला.






दुसरीकडे, वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताची घसरगुंडी उडाली. मात्र, सलामीवीर कॅप्टन रोहित शर्माने केलेल्या 87 धावांच्या खेळीनंतर कुलदीपने केलेल्या 49 धावांमुळे टीम इंडियाला 229 धावापर्यंत मजल मारता आली. 






इतर महत्वाच्या बातम्या